
वाळूज महानगर, (ता.25)- वाळुजजवळील नारायणपूर येथे अवैध कत्तलखाण्याचा रविवारी 24 मे रोजी पर्दाफास करून बकरी ईद निमित्त कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या नऊ गाईंची वाळूज पोलिसांनी सुटका करून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अवैधरीत्या चालु असलेल्या गोवंश कत्तलीच्या अनुषंगाने कारवाई कारवाई करण्यासाठी रविवारी 24 मे रोजी वाळुज पोलीस पाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड, अजय शितोळे, जलील पठाण व पोलीस अंमलदार स्वप्नील खाकरे, विजय पिंपळे आदी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 24 मे रोजी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान पोलीस उप निरीक्षक रमेश राठोड यांना गुप्त बातमी मिळाली की, मौजे नारायणपुर येथे स्मशानभुमी जवळ एका वाड्यात गाईची कत्तल करण्यात येत आहे. या माहीतीनुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तेथे मोसीन बशीर शेख हा मिळुन आला. या कत्तल खाण्याची पोलीसांनी पाहणी केली असता तेथे जनावरे कापण्याची जागा, जनावरे कापण्याची हत्यारे, मीठ, पाण्याचे भरलेले ड्रम आढळुन आले. तसेच नऊ जिवंत गाई आढळुन आल्या. त्या गाई कत्तल करण्याच्या उद्देशाने कत्तल खान्यात डांबुन ठेवण्यात आलेल्या असल्याचे आरोपी मोसीन शेख याने कबुल केले. याप्रकरणी आरोपी मोसिन बशीर शेख, (वय 23 वर्षे), बशीर अजीज शेख, दोन्ही रा. पंढरपूर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्यावर वाळूज पोलीस ठाण्यात गु.र.नं: 209/2026 महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियम कलम 5 ( ब ), 9 आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन मोसिन बशीर शेख यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र बशीर अजीज शेख हा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. या गुन्ह्यातील सर्व 9 गायींची सुटका करुन त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
ही कार्यवाही पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- 1, सहायक पोलीस आयुक्त छावणी विभाग यांच्या आदेशाने वाळुज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड, अजय शितोळे, जलील पठाण, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, स्वप्निल खाकरे, सुधाकर पाटील, बजरंग धाडगे, फुलकर यांच्या पथकाने केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची अवैध वाहतुक, तस्करी किंवा कत्तल याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी 02402240560 यावर संपर्क साधावा. किंवा डायल 112 वर माहीती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलिसांनी केले
