
वाळूज महानगर – कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडल्याने एका 30 वर्षीय महिला कामगाराचे बोटे मशीन मध्ये अडकून जखमी झाली. 19 ऑक्टोंबर रोजी झालेल्या या अपघाताप्रकरणी आरोपी कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील घाणेगाव शिवारातील आर.पी. इंटर प्राईजेस गट नं 115 प्लॉट नं 4 या कंपनीत दिक्षा अंबाजी रायभोळे (वय 30 वर्षे) रा. सावतामाळी मंदीराजवळ रांजणगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या महिला कामगार काम करत होत्या. त्यांना प्रेस मशीन बाबत कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना सुद्धा कंपनीचे मालक फिरोज पठाण यांनी बळजबरीने मशीनवर काम करायला लावले. तसेच त्या मशीनमध्ये बिघाड होत असल्याचे पठाण यांना कळवुन सुद्धा त्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे दीक्षा रायभोळे यांच्या डाव्या हाताची करंगळी व त्याच्या शेजारील बोटाला दुखापत झाली. 19 ऑक्टोंबर रोजी 11:30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी फिरोज पठाण यांच्या विरुद्ध 7 नोव्हेंबर रोजी कलम 289,125 (अ) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तांदळे करीत आहे.
