November 18, 2026

शहरप्रमुखांनी धरले महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर

वाळुज महानगर :- कोणतीही पूर्वसूचना अथवा जनजागृती न करता स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरण आणि खासगी एजन्सीचे कर्मचारी बजाजनगरात दाखल झाले. ते मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्नात असतानाच नागरिकांनी संताप व्यक्त करत तीव्र विरोध केला. त्यामुळे बजाजनगरात काही वेळ गोंधळ उडाला. ही माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. परिणामी मीटर न बदलताच अधिकारी आणि कर्मचारी माघारी परतले.

बजाजनगर येथील त्रिमूर्ती चौक, राधाकृष्ण हाऊसिंग सोसायटी (RM-83) आणि पंचगंगा हाऊसिंग सोसायटी (RM-82) परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये बुधवारी 18 नोव्हेंबर रोजी संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख विशाल खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेत स्मार्ट मीटर बाबत नागरिकांना शांत करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनातील शंका, संभाव्य अडचणी आणि पूर्वसूचना न देता मीटर बसवण्याच्या पद्धतीबाबत प्रश्नाचा भडीमार करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेल्या खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही ओळखपत्र, गणवेश नव्हता. तसेच त्यांची अधिकृत ओळख पटवणारी कोणतीही बाब दिसून येत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

यावेळी विशाल खंडागळे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत नागरिकांना विश्वासात घेऊन, योग्य जनजागृती करूनच पुढील प्रक्रिया राबवावी. अशी मागणी केल्याने अनिल गायकवाड यांनी कोमल बोढरे या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. कोमल बोढरे यांनी शासनाचे नियम आणि स्मार्ट मीटर प्रक्रियेबाबत माहिती देत नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेल्या महावितरणच्या पथकाला माघारी परतावे लागले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख सुदाम भंडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख बजरंग पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सिद्राम पारे, विभागप्रमुख सुनील पवार, गोरख वेळशंकर, रामेश्वर करपे, दीपक दयाळ, कडूबा केरे, उषा भंडे, नीता पवार, अनिता वेळंकर, पूजा माने, काजल दयाळ यांच्यासह राधाकृष्ण हाऊसिंग सोसायटी (RM-83) आणि पंचगंगा हाऊसिंग सोसायटी (RM-82) परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *