November 21, 2026

वाळूज महानगर – कार्तिकी एकादशीनिमित्त वाळूज परिसरातील प्रतिपंढरपुर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी अलोट गर्दी केली होती. मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध एकादशीच्या पावन पर्वावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पहाटे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व अनुराधा दानवे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक, महाआरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्याची सांगता रविवारी (दि.२२) श्री क्षेत्र सावखेड गिरी आश्रम मठाधिपती महंत गुरुवर्य हभप कैलास गिरी यांचे काल्याचे किर्तन व भाविकांना महाप्रसाद वाटपाने करण्यात येणार आहे.


मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र प्रतिपंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरली होती. विठुरायाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांसह मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक दिंड्या, पताका व टाळ मृदुंगाच्या जय घोषात विठू नामाचा गजर करीत आले होते. परिणामी पंढरपूर येथे मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. त्या दिवसभर होत्या. यावेळी लाखो भाविकांनी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेऊन दुष्काळावर मात करण्याची शक्ती देण्याचे साकडे घातले. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानतर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कार्तिकी एकादशी निमित्त लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी पंढरपूर येथे मंदिर परिसरासह राष्ट्रीय महामार्गावर दुकाने थाटली होती. त्यामुळे पंढरपूरला यात्रेचे स्वरूप आले होते. छोट्या भाविकांनी खेळणी खरेदी केली तर महिला भाविकांनी संसार उपयोगी साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी केली. देवदर्शनानंतर भाविकांनी जखडी भजनाचा आनंद लुटत विठू नामाचा गजर केला.

यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त ४६ वा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीत भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात दररोज काकडा भजन, पारायण, गाथा भजन, भागवत कथा, हरिपाठ, हरि किर्तन व हरिजागर आदी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच हभप शामकांत महाराज, हभप विजय महाराज पवार, हभप बालाजी महाराज मोहिते, हभप उत्तरेश्वर महाराज जाधव, हभप स्वामी विश्वनाथगिरी, हभप महंत हरिशरण गिरी, श्री गुरु उल्हास सुर्यवंशी, महंत रामगिरी येळीकर, महंत स्वामी विशुद्धानंद तिर्थ आदींनी भाविकांना किर्तनातून समाजप्रबोधन केले.

या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप रविवारी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. श्री क्षेत्र सावखेड गिरी आश्रम मठाधिपती महंत गुरुवर्य हभप कैलास गिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटपाने करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे पदाधिकारी, पंढरपूर व वळदगाव येथील नागरिक, स्वयंसेवक परिश्रम घेत आहे. दरम्यान एकादशीचे औचित्य साधून लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *