वाळूजमहानगर, (ता.9) – करोडी सब स्टेशन मधुन वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीतील गट नंबर मधील लहान मोठे उद्योजक त्रस्त झाले आहे. दररोजच्या या त्रासामुळे उद्योजकांनी धाव घेत वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत विजेची समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे.
याबाबत विज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या एका निवेदनात असे नमूद आहे की, करोडी सब स्टेशन अतर्गत वडगाव (को.), साजापूर, करोडी येथील गट नंबरमध्ये होणारा औद्यगिक विद्युत पूरवठा कित्येक दिवसापासुन योग्य रित्या होत नाही. त्यामुळे उद्योजकांचे आर्थिक नुसकान खुप मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील विद्युत पूरवठा हा दिवसातुन किमान चार ते पाच वेळा खंडित होत असतो. शिवाय व्होल्टेज सुध्दा कमी जास्त होत असल्यामुळे इलेक्ट्रिक मशीन मधीलस्पेअर पार्ट जळुन नुकसान होत आहे. याबाबत वाळूज येथील लघु उद्योजक अर्जुन आदमाने यांनी सांगितले की, या परिसरात लहान-मोठे उद्योजक आहेत. अनेक कंपनीतील सुटे भाग बनवून देण्याचे ते काम करतात. परंतु वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे समोरील पार्टीला पार्ट वेळेवर बनुन देता येत नाही. त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला काम देणे बंद केले आहे. अशा परिस्थीती मध्ये उद्योजक मंडळीना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. वितरण कंपनीने लघु उद्योजकांच्या या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन येथील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा. नसता आम्ही सर्व उद्योजक लोकशाही मार्गाने जन अंदोलन करून उपोषण करु. असा इशाराही उद्योजक अर्जुन आदमाने पाटील यांनी दिला आहे.
