
वाळूज महानगर, (ता. 8) – गंगापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये 108 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. 7) वाटाघाटी झाल्याने 93 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच्या सर्व 15 जण बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. विजयानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले पिंपरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष जनार्धन चनघटे यांचा वाळुज येथे स्वागत करण्यात आले.

गंगापूर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादीतर्फे आ. सतीश चव्हाण व नगराध्यक्ष संजय जाधव, भाजपतर्फे आ. प्रशांत बंब, शिवसेनेतर्फे आ. रमेश बोरनारे, दिलीप निरफळ व कृष्णा पाटील डोणगावकर यांनी परिश्रम घेतले.
काँग्रेसला सर्वाधिक पाच जागा –
या निवडणुकीतील 15 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक 5 जागा देण्यात आल्या. तर त्या खालोखाल भाजपला 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 2 व कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाला 2 जागा सोडण्यात आल्या.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे –
गंगापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे लक्ष्मणराव भुसारे, बद्रीनाथ बाराहाते,
सुभाष धोत्रे, भाऊसाहेब बाराहाते, ज्योती संदीप कानडे, भाजपचे नाना जगताप, ज्ञानेश्वर म्हस्के, कृष्णा मुरलीघर एडके, जनार्दन कचरू चनघटे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाबाई शिवाजी बोडखे, राजाभाऊ भाऊसाहेब दंडे आणि शिवसेनेतर्फे सारंगधर जाधव, रामभाऊ शंकर धोत्रे तर कृष्णा पाटील डोणगावकर गटातर्फे बालचंद जाधव, नारायण सोलणकर यांचा समावेश आहे.
बिनविरोध विजयानंतर जल्लोष –
निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध विजयी झाल्यानंतर उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. यावेळी किरण पाटील डोणगावकर, नगराध्यक्ष संजय जाधव, शेषराव जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन म्हस्के यांनी काम पाहिले.

जनार्दन चनघटे यांचे वाळूज येथे स्वागत –
गंगापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले पिंपरखेडा येथील जनार्दन चनघटे (चेअरमन) यांचे वाळुज येथे स्वागत करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शंकरबापू कुंजर, बाबासाहेब शिंदे, श्रीराम इंगळे, किरण श्रीखंडे, भगवान पाटील, आर के भराड, जनार्धन गांधीले पाटील, हिवाळे पाटील, लिंबे जळगाव येथील नंदू जगताप, रामदास आलोने यांची उपस्थिती होती.
