June 12, 2026

वाळूज महानगर, (ता.12) – जटवाडा येथील दैवत वृद्धाश्रमात 29 मे रोजी भीषण आग लागून धान्यसाठा, बेड, कपडे तसेच इतर जीवनावश्यक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व वृद्धांचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र या दुर्घटनेमुळे आश्रमास मोठे आर्थिक नुकसान झाल्याने जय श्रीराम व्हॉलीबॉल ग्रुपच्या पुढाकाराने त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.

जटवाडा परिसरातील दैवत सेवाभावी संस्था, संभाजीनगर यांच्या वतीने संचालित “दैवत वृद्धाश्रम” येथे सध्या 42 वृद्ध नागरिक वास्तव्यास असून त्यामध्ये 33 महिला व 9 पुरुषांचा समावेश आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात आधाराची गरज असलेल्या या ज्येष्ठ नागरिकांवर नुकतेच मोठे संकट कोसळले. ही घटना समजताच सामाजिक बांधिलकी जपत जय श्रीराम व्हॉलीबॉल ग्रुप, बजाजनगर, सिडको महानगर-1 यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. 11 जून रोजी ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन 10 लिटर क्षमतेचे दोन कुकर, खाद्यतेल, गूळ, मीठ तसेच विविध प्रकारच्या डाळींचे वाटप केले. या मदतीमुळे वृद्धाश्रमाच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मोठा आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे, वृद्धाश्रमासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सदस्य देवगिरी सुपरमार्केट येथे गेले असता या उपक्रमाची माहिती समजल्यावर देवगिरी सुपरमार्केट व्यवस्थापनानेही पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले. समाजाप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सामाजिक उपक्रमात व्यंकट मैलापुरे, विनोद चौधरी, आकाश लाहोटी, सुरज पाटील, ओमप्रकाश कास्नीया, भागीनाथ गोरे, एफ. बी. शेख, संजीव तिवारी, प्रभाकर काष्टे, पृथ्वीराज जाधव, बी. के. चव्हाण, बाळू चव्हाण, देवगिरी मार्केटचे हर्षद खांडरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. याप्रसंगी वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या संचालिका उमा तुपे यांच्याशी झालेल्या चर्चेत आश्रमासाठी पत्रे बसविणे, किराणा साहित्य, बेडिंग साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची तातडीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक साहित्याची यादी प्राप्त झाल्यानंतर पुढील टप्प्यात आणखी मदत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी जय श्रीराम व्हॉलीबॉल ग्रुपच्या वतीने व्यंकट मैलापुरे यांनी समाजातील उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले की, दैवत वृद्धाश्रमाच्या पुनर्बांधणीसाठी आणि येथील ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे. आर्थिक मदत, अन्नधान्य, बांधकाम साहित्य किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात सहकार्य करून येथील वृद्धांना आधार द्यावा. वृद्धांची सेवा हीच खरी मानवसेवा आहे. असेही मैलापुरे यावेळी म्हणाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *