July 27, 2026

   

 * 10 ट्रॅक्टर चपला व 30 ट्रॅक्टर उचलला कचरा *

वाळूजमहानगर – वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त भरलेल्या मोठ्या यात्रेत लाखो भाविक दाखल झाले होते. यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीत अनेक भाविकांचे पादत्राणे तेथेच विसरल्याने मंदिर परिसरात बूट, चपलांचा मोठा ढीग साचला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नू यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे रविवारी 26 जुलै रोजी स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात आले. यावेळी 8 ते 10 ट्रॅक्टर चपला व 30 ते 35 ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला. या मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या 16 टीमचा सहभाग घेतला.


प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंढरपूर हे गाव धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी प्रमाणे शनिवारी 25 जुलै रोजी आषाढी एकादशीची यात्रा उत्साहात झाली. या यात्रेला अंदाजे दहा ते बारा लाख भाविक आले होते. यात्रेदरम्यान अनेक भाविकांची पादत्राणे मंदिर परिसरात विसरल्याने तेथे मोठा ढीग साचला होता तसेच परिसरात केरकचराही मोठ्या प्रमाणात साचला होता. छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नू यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे रविवारी 26 जुलै रोजी स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात आले. प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रति पंढरपूर या ठिकाणी येवून स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पूर्ण केला. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सकाळी 8 वाजताच सर्व ताफ्यासह पंढरपूर या ठिकाणी आल्या. यावेळी जि. प चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, जिल्हा परिषदचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोरपडे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती छत्रपती संभाजीनगरचे गट विकास अधिकारी शिवाजी साळुंके, महिला व बाल विकास अधिकारी, सुपरवायझर तसेच विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच तालुक्यातील शिक्षक साफसफाईसाठी उपस्थित होते. दरम्यान तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व त्यांचे कर्मचारी आपापली वाहने व घंटागाड्या घेऊन पंढरपूर या ठिकाणी हजर झाले होते. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार 16 टीम तयार केल्या. आणि या 16 टीमने पंढरपूर पासून गोलवाडी चौकापर्यंतचा पूर्ण परिसर स्वच्छ केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू यांनी स्वतः कचरा उचलून ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे साफसफाई मोहिमेमध्ये भाग घेतला.

या साफसफाई मोहिमे दरम्यान मंदिर व मंदिर परिसरातून आठ ते दहा ट्रॅक्टर बुट, चप्पल उचलण्यात आल्या. तसेच परिसरातून अंदाजे 30 ते 35 ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला. यावेळी पंढरपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच शेख अख्तर व वळदगावचे माजी सरपंच कांताराव नवले यांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनीही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभाग नोंदवून स्वच्छता मोहिम राबवली. पंढरपूरच्या सरपंच वैशाली बाळासाहेब राऊत, उपसरपंच रेश्मा अख्तर शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, रोहित राऊत, लक्ष्मण खोतकर, मेहबूब चौधरी आदी नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रविण लोहाडे तसेच पंढरपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी हरीश आंधळे यांनी सर्व व्यवस्था व नियोजित करून या मोहिमेत सक्रिय भाग घेतला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *