* पुण्यामध्ये ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान सोहळा’ उत्साहात
* विविध क्षेत्रातील ५० हून अधिक गुणवंतांचा गौरव

वाळुज महानगर – पुणे येथे नुकत्याच झालेल्या
राज्यस्तरीय ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान सोहळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा ग्रामपंचायतला महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ज्योती नंदकिशोर मुळे यांचा आदर्श सरपंच तर बबन तान्हांबाई भाऊसाहेब गव्हाणे यांचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून गुणगौरव करण्यात आला.

समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या राज्यातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव करण्यासाठी नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित केलेला राज्यस्तरीय ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ रविवारी, 27 सप्टेंबर रोजी पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात झाला.

सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक, राजकीय, ग्रामीण विकास, आरोग्य, कला, शिक्षण, उद्योग आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दवणे, ए.आर.जे. एशिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन जितेंद्र तुळशीराम दाते आणि वृक्ष अभ्यासक व नर्सरी तज्ज्ञ वंदना जाधव उपस्थित होत्या.
सन्मानाचे स्वरूप –
निवड झालेल्या गुणवंतांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. केवळ पुरस्कार देऊन न थांबता, या गुणीजनांचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या कार्याची व्हिडिओ मुलाखत, कार्यावर आधारित विशेष लेख आणि सोशल मीडिया ब्रँडिंगच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करून देण्यात आली.
कार्यक्रमाचा उद्देश –
“राज्यभरात उत्तम काम करणाऱ्यांना एका व्यासपीठावर आणणे आणि त्यांच्या माध्यमातून भविष्यात विविध गावांमध्ये सामाजिक योजना राबवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” असे आयोजकांनी यावेळी नमूद केले.
या सोहळ्यात कला आणि सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, महसूल, आरोग्य, कृषी, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. पुरस्काराला उत्तर देताना अनेक गुणवंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेच्या प्रतिनिधींनी केले. या सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
