
वाळुज महानगर – प्रत्यक्षात कोणतीही जमीन शिल्लक नसताना संगणमत करून केवळ सात बारा उता-याचे पोकळीस्त नोंदीच्या आधारे वेगवेगळे खरेदी खत करून देऊन अंदाजे दीड कोटी रुपये किमतीची 93 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वाळुज, गुरुधानोरा, वडगाव (कोल्हाटी), औरंगपूर व सुलतानपूर येथील आठ जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात 28 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजकुमार अल्गर स्वामी (वय 59) रा. श्रेवेल्ली पुत्तुर, जि. विरुदुनगर, तामिळनाडु (ह. मु. राजपुत पेट्रोलपंपचे मागे, पंढरपुर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी व त्यांचा भाऊ पन्नु अल्गर स्वामी यांनी गुरुधानोरा शिवारीतील गट नं. 84 मधील 5 एक्कर 25 गुंठे जमीन गुरुप्रितसिंग महेन्द्रसिंग जग्गी यांच्याकडुन 4 जून 2007 रोजी विकत घेतली असून त्यांची सात बारा मध्ये नोंद झाली आहे. ही जमीन विकत घेतल्यानंतर जमीनला संपुर्ण बाजुस सिमेंट पोलने तार कंपाउंड करून मालकी हक्काबाबत बोर्ड लावला आहे. 2012 मध्ये पन्नु अल्गर स्वामी मरण पावल्याने ही जमीन वारसा हक्कानुसार विजयालक्ष्मी पन्नु स्वामी हिचे नावावर केली. व सातबा-यावर विजयालक्ष्मीचे नाव आहे. ही जमीन नामदेव तुपे रा. मुरमी यांना दोन वर्षापासुन बटाईने दिली आहे. दरम्यान 26 फेब्रुवारी 2026 रोजी आठ दहा लोकं या जमिनीचे जुने तार कंपाऊंड तोडून नवीन तार कंपाऊंड करत असल्याची माहिती मिळाल्याने स्वामी कुटुंबाने धाव घेऊन विचारपूस केली असता त्यांनी ही जमीन विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. त्यानंतर स्वामी कुटुंबीयांनी जमीनीचे तहसिल कार्यालयातुन खरेदी खत व फेरफार नियमा प्रमाणे घेतले असता जमीन हडपण्याचा हा प्रकार उघडकीस आला.
पोकळीस्त नोंदीच्या आधारे केले खरेदी खत –
गुरुधानोरा येथील गट न. 84 मध्ये कोणतीही जमीन शिल्लक नसताना केवळ सात बारा उता-याचे पोकळीस्त नोंदीच्या आधारे हरीचंद्र फकीरराव चक्रनारायण, रंजना हरिचंद्र चक्रनारायण यांनी स्वामी बंधूंच्या जमीनी मधील 38 गुंठे जमीन शरद भाऊसाहेब पवार यास विक्री केली. तसेच शांताबाई फकीरराव चक्रनारायण, नंदु फकीरराव चक्रनारायण यांची गट न. 84 मध्ये कोणतीही जमीन शिल्लक नसताना केवळ सात बारा उता-याचे पोकळीस्त नोंदीच्या आधारे संगणमत करुन व चुकीची चतुर्सिमा दाखवुन 55 गुंठे जमीन शरद भाऊसाहेब पवार व ज्ञानेश्वर जगन्नाथ मोगल यांना विक्री केल्याचे दिसुन आले. तसेच 38 व 55 गुंठे अशी एकुन 93 गुंठे जमीन शरद बाऊसाहेब पवार व ज्ञानेश्वर जगन्नाथ मोगल यांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी फिरोजखाँ नबीखॉ पठाण रा. वाळुज यांना विक्री केल्याचे दिसुन आले.
कटकारस्थान व संगणमत करून फसवणूक –
या प्रकरणातील गट न. 84 चे मुळ मालक हरीचंद्र फकीरराव चक्रनारायण, रंजना हरिचंद्र चक्रनारायण, शांताबाई फकीरराव चक्रनारायण, नंदु फकीरराव चक्रनारायण रा. गुरुधानोरा ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या सोबत कट कारस्थान करुन चक्रनारायण कुटुंबाची गट न. 84 मध्ये जमीन अस्तीत्वात नाही. परंतु त्यांचे सात बा-यावरील पोकळीस्त नोंद (जमीन) बाबत पुर्व कल्पना असताना चक्रनारायण यांनी दोन वेगवेगळ्या खरेदीखताद्वारे स्वामी यांच्या ताब्यातील जमीनीची चुकीच्या चतुर्सिमा दर्शवुन त्या ख-या असल्याचे भासवुन शरद भाऊसाहेब पवार, ज्ञानेश्वर जगन्नाथ मोगल यांना विक्री केली व शेवटी शरद पवार व ज्ञानेश्वर मोगल यांनी फिरोजखों नबीखों पठाण रा. वाळुज यांना विक्री केली. त्या आधारे स्वामी कुटुंबाच्या जमीनीवरील तार कंपाऊन्ड तसेच नावाचा बोर्ड तोडुन अंदाजे दिड कोटी रुपयाच्या 93 गुंठे जमीनीवर अतिक्रमण करुन ती हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वाळूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
