
वाळूजमहानगर, (वार्ताहर) – बजाजनगर परीसरातील शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी टाळ – मृदंग आणि पखवाजाच्या गजरात तसेच वारकरी व संत यांच्या वेशभूषेत पावलीच्या तालात विठ्ठल नाम व अभंगाच्या सुरात विठ्ठल – रुक्मिणीची पालखी काढण्यात आली. शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ही दिंडी भक्ती रसात लावून निघाली.
प्रथम विद्यालयाच्या प्रांगणात शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले व संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव जाधव यांनी पालखीचे पूजन करून वारकरी संप्रदायातील संतांना वंदन केले. आणि दिंडी विठ्ठल -रुक्मिणी मंदिराकडे निघाली.
धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनासोबत सामाजिक उद्बोधन आणि समाजातील विशुद्ध घटना संबंधी जनतेत जाणिव व त्यांच्या विरुद्ध एकसंघ उभे टाकण्याची भावना निर्माण व्हावी. हा या दिंडी काढण्या मागचा उद्देश होता.
पर्यावरणीय घटकांची जाण व्हावी या करीता विविध स्लोगन व प्रतिके याव्दारे या दिंडीमध्ये संदेश समाजातील घटकापर्यंत प्रसारित करण्यात आला. टाळ – मृदंगाच्या गजरात वारकरी दिंडी विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात पोहचली. तेथे विद्यार्थी वेशातील वारकऱ्यांनी गोल रिंगण करून पावली खेळली आणि संत तुकारामाचे अभंग गायले. शेवटी विद्यालयाच्या वतीने वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांचे मार्गदर्शन व सहयोगातुन करण्यात आले. या करीता शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
