
वाळूजमहानगर – पंढरपूर येथील जुने रांजणगाव रोडवर व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप आयोजित करण्यात येते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी अवघ्या दहा वर्षाच्या चिमुरडीने विठ्ठलाच्या वेशभूषेत एका अनोख्या भक्तीरूपाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पूर्वी विशाल खंडागळे ही 10 वर्षांची चिमुरडी आपले आजोबा माजी सैनिक एकनाथराव बाबुराव राऊत ( वय 90 ) व आजी हरणाबाई एकनाथ राऊत (वय 85 ) यांच्या भक्तीमय संस्कारातून आणि आशीर्वादाने गेल्या 5 वर्षांपासून
रांजणगाव रोडवर व्यापारी मित्र मंडळाच्या फराळ वाटपाच्या ठिकाणी साक्षात विठ्ठल रूप धारण करून उभी राहते. यंदाचे तिचे हे पाचवे वर्ष आहे. सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कडक शिस्त, अखंड एकाग्रता, तुळशीची माळ, डोक्यावर मुकुट आणि चेहऱ्यावर साक्षात विठूरायाचे भाव घेऊन उभी ठाकलेली ही विठ्ठलाच्या वेशभूषेतील चिमुरडी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने फराळ वाटप स्थळी येणारे-जाणारे भाविक तिचे विठ्ठल रूप पाहण्यासाठी गर्दी करत होते. अत्यंत आपुलकीने तीचे विठ्ठल रूप समजून तिच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेत आहेत आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी करत होते.
————
