August 11, 2026

“अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रांवर जाऊन परिस्थिती पाहावी”

 

वाळूज महानगर, (दि. 11) – पंढरपूर गटातील महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना जिल्हापरिषद सदस्या विद्या रमेश गायकवाड यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रकल्प बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस प्रकल्प बाल विकास अधिकारी भंडारे, पर्यवेक्षक मनीषा कदम, बोधगिर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पंढरपूर गटातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार, इमारत, पाणी, स्वच्छतागृह, वीज तसेच बालकांना मिळणाऱ्या सेवांबाबत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा विद्या रमेश गायकवाड यांनी यावेळी दिला.

“अंगणवाडी ही केवळ शासकीय कार्यालयीन नोंदीतील केंद्रे नाहीत, तर गोरगरीब कुटुंबातील बालकांच्या भविष्याचा पाया आहे. त्यामुळे कागदावरची आकडेवारी दाखवून काम पूर्ण झाल्याचे सांगणे चालणार नाही. अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थिती तपासावी,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य, पोषण आहाराचा दर्जा, गर्भवती व स्तनदा मातांना मिळणाऱ्या सुविधा आणि अंगणवाडी सेविकांच्या अडचणी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. शासनाचा निधी आणि योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अंगणवाडी केंद्रांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित दौरे करावेत, प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि प्रत्येक केंद्राचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

“पंढरपूर गटातील महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर मी कोणतीही तडजोड करणार नाही. जनतेच्या पैशातून चालणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासनाने काम केले तर आम्ही पाठिशी राहू; मात्र कामात हलगर्जीपणा झाला तर जिल्हापरिषद सदस्य म्हणून त्याचा जाब नक्की विचारला जाईल,” असेही गायकवाड म्हणाल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या