
वाळूज महानगर :- बजाजनगर येथील मुख्य बाजारपेठ असलेला मोहटादेवी मंदिर परिसर सध्या गंभीर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने येथे दररोज वाहनांची कोंडी होते. परिणामी नागरिक आणि वाहनधारकांना नाहक त्रास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या गौरी गणपतीचे दिवस असल्याने खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. त्यातच संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत कंपन्यांची शिफ्ट सुटल्यानंतर आणि जवळच भाजीमंडी असल्याने या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या गाड्यांमुळे साधे वाहन काढणेही मुश्कील झाले आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे मोहटादेवी मंदिराला लागूनच असलेली पोलीस चौकी केवळ ‘शोभेची वस्तू’ बनली आहे. तिथे ट्रॅफिक नियंत्रणासाठी कोणीही उपस्थित नसते आणि असले तरी या रोजच्या गोंधळाकडे कोणाचेही लक्ष नसते. या ढिम्म कारभाराविरोधात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शिवसैनिकांचा कोंडमारा झाला आहे.
सणासुदीच्या काळात बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिर या चौकात तत्काळ वाहतूक पोलीस तैनात करून वाहतूक सुरळीत करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा शिवसेना शहरप्रमुख विशाल खंडागळे, उपतालुका प्रमुख सुदाम भंडे, काकाजी जीवरग, उपशहर प्रमुख रोहिदास चव्हाण, प्रभागप्रमुख भगवान देशमुख, शंकर राठोड, विभागप्रमुख संजय सोनुने, संदीप सोनवणे, विनोद सोनवणे, लहू खराटे, अमोल वाघमारे, शिवशंकर सगट, विनोद दाभाडे, शाखाप्रमुख सिद्धू नरसाळे, अमोल देशमुख, शिवसैनिक संशोधन सावते आणि ओंकार देशमुख यांच्यासह त्रस्त नागरिक व व्यापारी यांनी दिला आहे.
