
वाळूजमहानगर, (ता.3) – बजाजनगर येथील स्व.भैरोमल तनवानी विद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर होऊन त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची आरोग्य तपासणी शुक्रवारी (ता.2) रोजी केली.
बजाजनगर येथील स्व भैरोमल तनवाणी विद्यामंदिरात शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध पदावर कार्यरत आहे. त्यातील काही डॉक्टर तर काही वकील सीए झालेत. त्यातीलच डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी नगर शहरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यातील डॉ.ऋतुजा गांगर्डे, डॉ. भक्ती भालेराव, डॉ. धनश्री भालेराव, डॉ. श्रुतीला पेटकर, डॉ. वैष्णवी काकडे, डॉ. प्रतिक्षा तोडमल, डॉ. सतेंद्र यादव यांनी बजाजनगर येथील विद्यालयात येऊन शुक्रवारी (ता.2) रोजी शिक्षकांची आरोग्य तपासणी केली. व त्यांना उत्तम आरोग्यासाठी काय करावे. याबद्दल माहिती वजा सल्ला दिला. आपल्याच विद्यार्थ्यांकडून आपली आरोग्य तपासणी करून घेताना फार गहिवरून आल्याचे मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे म्हणाल्या. संस्थेचे पदाधिकारी तथा उद्योजक हनुमान भोंडवे यांनी सर्व डॉक्टरांचे स्वागत केले.
