वाळूजमहानगर, (ता.28) – गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेल्या वाळूज ते कमळापूर या वाळूज औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अखेर आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते सोमवारी (ता.26) रोजी करण्यात आले. या रस्त्याचे काम दर्जेदार झाले. तर वाळूज औद्योगिक वसाहतीची वाट सुकर होणार आहे.
औद्योगिक वसाहतीमुळे वाळूज ते रांजणगाव या मार्गाने मोठ्या प्रमाणात कामगार कामानिमित्त ये-जा करतात. हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. परंतु या रस्त्याची मागील वर्षा पासून अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. परिणामी रस्त्याने प्रवास करतांना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. हा रस्ता व्हावा म्हणून परिसरातील कामगार व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने, रास्ता रोको व संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी (ता.26) जुन रोजी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक नंदकुमार गांधिले, सरपंच सईदा पठाण, जोगेश्वरीचे उपसरपंच नजीरखा पठाण, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गंगाराम हिवाळे, गोरख शेळके, बाबुराव हिवाळे, रतन बत्तासे, दीपक सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य राहूल भालेराव, नदीम झुंबरवाला, माजी सभापती ज्योती गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पारधे, सर्जेराव भोंड, हरिभाऊ काजळे, संजय दुबिले, नंदू सोनवणे, अमोल शिंदे, सुखदेव जगताप, भारतीय जनता पार्टीचे संतोष वडाळे, रामेश्वर मालुसरे, बाबासाहेब शिंदे अशोक हिवाळे, सचिन मुंडे, नामदेव ईले, प्रवीण साकला, मंगेश हेन्द्रे. सुरेश केरे, देवेंद्र चव्हान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विक्रम माने, रोहिदास शेलार, ठेकेदार चेतन जैन यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुमारे वर्षभरातपूर्वी करण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने ते थातूर मुतुर केले होते. या रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत अनेक फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यातील प्रमुख म्हणजे तोंडाच्या सहाय्याने डुकराने उघडलेला रस्ता.
या रस्त्यासाठी अंदाजे साडेपाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सिमेंट काँक्रीटच्या या रस्त्याचे काम समृद्धी ईम्फो. या कंपनीला दिले आहे. याचा कालावधी 3 ते 4 महिन्याचा असून, लवकरात लवकर व चांगल्या दर्जाचा रस्ता करण्यात यावा. अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
