
वाळूजमहानगर, (ता.4) – वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने वाळूज परिसरात पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली. त्यामुळे सर्वत्र दानादान उडाली. दरम्यान पावसामुळे शेतातील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला थांबलेल्या चुलत्या पुतण्यावर वीज पडली. या दुर्दैवी घटनेत 23 वर्षीय चुलत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा 14 वर्षीय पुतण्या होरपळून जखमी झाला. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (ता.4) रोजी दुपारी घडली. 
पावसाचे दिवस जवळ आल्याने शेतात सर्वत्र मशागतीचे काम सुरू आहे. तुर्काबाद (खराडी) येथील कृष्णा रामदास मेटे वय वर्षे 23 व निलेश (बंटी) संतोष मेटे वय वर्षे 14 हे तुर्काबाद कासोडा (लवकी) रस्त्यावरील गट नंबर 183 मधील शेतात काम करत होते. चुलतेपुतणे शेतात असताना वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस आला. त्यामुळे कृष्णा मेटे व निलेश मेटे हे शेतातील लिंबाच्या झाडाखाली आडोशाला थांबले. त्याच वेळी विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत कृष्णा रामदास मेटे यांचा जागीच मृत्यू झाला तर निलेश मेटे हा होरपळून जखमी झाला. रविवारी (ता.4) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत दोघांनाही बैलगाडीतून उपचारार्थ घाटीत दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तपासून कृष्णा मेटे यांना मयत घोषित केले तर निलेश मेटे याच्यावर उपचार सुरू आहेत.
सर्वत्र हळहळ –
या घटनेतील मयत कृष्णा रामदास मेटे (23) व निलेश संतोष मेटे (14) हे अल्पभूधारक असून ते नात्याने चुलते पुतणे होते. कृष्णा मेटे हा घरात सर्वात मोठा होता. त्यास एक भाऊ व एक बहीण असून कृष्णा हा अविवाहित होता.
त्याच्यावर शेतीची जबाबदारी असल्याने हा तरुण शेतकरी पुतण्यासह शेतात असतांना दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे तुर्काबाद (खराडी)सह गंगापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
पावसाने उडवली दाणादाण –
वाळूज परिसरात रविवारी (ता.,4) रोजी दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि पाहतापाहता वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस आला. अचानक आलेल्या या वादळ व पावसामुळे संभाजीनगर ते दहेगाव (बंगला) दरम्यान अनेक झाडं रस्त्यावर पडले. वाहनधारकांना झाडं बाजुला करीत रस्ता पार करावा लागला. तर झाड आडवे झाल्याने काही वेळ रस्ता जाम झाला होता.
अनेकांचे पत्रे उडाले –
यावेळी वादळाने परीसरात अनेकांच्या घरावरील पत्रे, पानटपर्या उडाल्या. यात सुदैवाने कुणीही जखमी नसल्याचे नागरिकांनी सागीतले. लिंबेजळगावात पोर्णीमा महोत्सव असल्याने दुपारी 1 वाजता प्रवचन होताच नागरिक महाप्रसादासाठी जेवायला बसले, आणि काही क्षणात जोरदार वादळ सुटल्यानंतर नागरीकांनी जेवन सोडुन मंडपातुन काढता पाय घ्यावा लागला.
