
वाळूजमहानगर, ता.13 (बातमीदार) – तीन लाख रुपये दिल्याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयात यायचे नाही. असे म्हणत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारे तीन धनादेश (चेक) फाडून ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळ घातला. तसेच धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी देत तीन लाख रुपयाची खंडणी मागितली. ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (ता.11) रोजी झालेल्या या घटने प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पितापुत्राविरुद्ध गुरुवारी (ता.13) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेलोहळ ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच भारती दिलीप बनक, वय 52 वर्षे, रा. विठ्ठल मंदीराजवळ, आंबेलोहळ ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या मंगळवारी (ता.11) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात असताना आरोपी बाजीराव चोरमारे व त्यांचा मुलगा अक्षय चोरमारे हे कार्यालयात आले. त्यावेळी सरपंच भारती बनकर या ग्रामनिधीमधून गावातील दिव्यांग व्यक्ती वैभव सुखदेव बिडवे व कुशवाह सिंग यांना चेक वाटप करत होते. यावेळी बाजीराव चोरमारे यांनी सरपंच भारती बनकर यांना तीन लाख रुपये दिल्याशिवाय ग्रामपंचायतमध्ये यायचे नाही. असे म्हणून तीन लाख रुपयाची खंडणी मागितली व वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चोरमारे पिता-पुत्रांनी सरपंच भारती बनकर यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. व अक्षय चोरमारे याने टेबलावरील काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेला. यावेळी बाजीराव चोरमारे यांनी सरपंच बनकर यांच्या हातातील तीन चेक हिस्कावून फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच भांडण झाले.
यावेळी वसिम कुरेशी, विष्णु प्रधान, किसन गवळी यांनी चोरमारे व बनकर यांच्या भांडणाची सोडवासोडव केली. या प्रकरणी आंबेलोहळ ग्रामपंचायतच्या सरपंच भारती दिलीप बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाजीराव चोरमारे व अक्षय चोरमारे यांच्यावर कलम 384,504,506,34 भादंवि. प्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघेही पदाधिकारी-
या प्रकरणातील फिर्यादी भारती दिलीप बनकर या आंबेलोहळगावच्या प्रभारी सरपंच सरपंच असून आरोपी बाजीराव चोरमारे यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य असून ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत.
सरपंचालाच मागितली खंडणी –
ग्रामीण भागातील राजकारण तसे फारच बेकार असते, त्यामुळे सत्तेसाठी एकमेकांवर कुरघोडीचे प्रकार नेहमी घडतात. तसेच अविश्वास ठरावाचे हत्यारही उपासल्या जाते. मात्र खुद्द सरपंचालाच ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने खंडणी मागितल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. यामुळे परिसरात चर्चेला वेगळेच उधाण आले आहे.
