
वाळूज महानगर, (ता.19) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने कंपनीतील कामगाराच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन कामगार ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात लिंबेजळगाव येथील पिट्टी कंपनीजवळ मंगळवारी 19 मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, येसगाव येथील पंढरीनाथ सिताराम दिवटे, नवनाथ मोहन दिवटे व संजय दामोदर तांबे असे तिघे कंपनीत काम करून दुचाकी (एम एच 20, डी एक्स- 6806) वरून येसगाव येथे घराकडे जात होते. त्याचवेळी भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील लिंबेजळगाव येथील पिट्टी कंपनीजवळ मंगळवारी 19 मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुरात झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच इसारवाडी फाटा या पॉईंटवर असलेल्या श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज नाणीज धामच्या विनामूल्य रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत गंभीर जखमीला उपचारार्थ दहेगाव (बंगला) येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांच्या मदतीने घाटी हॉस्पिटल येथे दाखल केले.

या अपघातात पंढरीनाथ सिताराम दिवटे (वय अंदाजे 35 वर्ष), संजय दामोदर तांबे (वय 40 वर्ष) हे दोघे ठार झाले. तर नवनाथ मोहन दिवटे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघाताची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ खोसरे करीत आहे.
————–
