March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – वाळूज औद्योगिक परिसरातील पंधरा वर्षे व बारा वर्ष वय असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे (मैत्रिणी) कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी काहीतरी आमिष दाखवून फुस लावून दोघींनाही पळवून नेले. ही घटना बुधवारी (ता.3) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव येथे हिना वय 15 आणि मीना वय 12 या (नाव बदललेले)  दोन्ही मैत्रिणी आहेत. बुधवारी (ता.3) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हिना ही घरी असताना मी बाथरूमला जाऊन, पाच मिनिटात येते. असे आईला म्हणून गेली. परंतु ती परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने मीनाच्या घरी जाऊन पाहिले असता मीना सुद्धा घरातून गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र दोघीही मिळून आल्या नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांची खात्री झाली की, दोन्ही मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी हिनाच्या आईच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे या दोन्ही मुलींचा शोध घेत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांनी आपल्या पाल्या विषयी (विशेषतः मुलीं) सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *