
वाळूजमहानगर (प्रतिनिधी) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एका 34 वर्षीय रिक्षा चालक तरुणाला बोलावून घेऊन त्याच्या मानेवर बियरची बाटली मारून जखमी केले. तसेच त्याच्या इतर दोन साक्षीदारांनीही हाताचापटाने मारहाण केली. वाळुज परिसरातील घाणेगाव येथील तळ्याजवळ 3 सप्टेंबर रोजी रात्री 11:45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रिक्षा चालक सचिन गोरखनाथ थोरात (वय 34) रा. न्यू हनुमाननगर कमलापूर ता गंगापूर छत्रपती संभाजीनगर याने सरला हिरामण धनगर हिच्या सोबत आठ महिन्यापूर्वी श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे गळ्यात हार घालून लग्न केले. त्यानंतर 10 जुलै 2026 मध्ये सरला ही किरण हरिभाऊ ताजी रा. पळसवाडी ता खुलताबाद छत्रपती संभाजीनगर याच्या सोबत पळून गेली. तेव्हापासून सचिनचे किरण ताजी याच्या सोबत भांडण चालू आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी किरण हरिभाऊ ताजी घरी असताना फोन करून शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्याने घाणेगाव तळ्याजवळ बोलावले व आज तुला दाखवतोच असे म्हणून बियरची बाटली मानेवर मारून जखमी केले. व त्याच्या सोबतच्या दोघांनी हाताचापटाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री 11:45 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
