
वाळुज महानगर – नागेश कुठारे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर तिसगाव चौफुली ते कांचनवाडी सर्व्हिस रोडच्या निकृष्ट कामाबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी NHAI चे साहित्य व्यवस्थापन गुणवत्ता सहाय्यक अभियंता महेशकुमार विजयपुरीया यांनी मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तिसगाव धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव चौफुली ते कांचनवाडी या सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
या पाठपुराव्याची संबंधितांनी दखल घेत पाहणी केली. यावेळी त्यांना विविध समस्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून देण्यात आल्या. यामध्ये 1) सर्व्हिस रोडवरील धोकादायक व निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभाग, त्यामुळे तू चाकी स्वरांना होणारा धोका. 2) रस्त्याच्या साईडपट्ट्यांमध्ये टाकण्यात आलेली माती.
3) अतिरिक्त निघालेले बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त व धोकादायक पद्धतीने पसरलेले असणे. 4) सर्व्हिस रोडला सिडकोच्या मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम अद्याप अपूर्ण असणे. 5) ए. एस. क्लबच्या बाजूकडील रस्त्यावर पडलेले धोकादायक बांधकाम साहित्य.
या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर संबंधित अभियंत्यांनी याबाबत कार्यकारी अभियंता NHAI यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिले. या पाहाणी दरम्यान नागेश कुठारे, नरेंद्रसिंग यादव,निलेश माटे,आकाश मुदीराज आदिची उपस्थिती होती.
