लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ः जय, आरव, अश्विन, जयेश, चिन्मय, साईराज सामनावीर

वाळूज महानगर :- औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित लोळगे ट्रॉफी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल, नाथ व्हॅली इंग्लिश स्कूल, वुडरिज हायस्कूल, आर जे इंटरनॅशनल स्कूल, केंब्रिज इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल इंग्लिश स्कूल या संघांनी आपापल्या सामन्यांत विजय नोंदवले. या सामन्यांमध्ये जय विष्णू जाधव, आरव अतकरे, अश्विन बोरसे, जयेश कावळे, चिन्मय श्रीवास्तव, साईराज यांनी चमकदार कामगिरी नोंदवत सामनावीर पुरस्कार मिळवला.

पोदार इंटरनॅशनलची ७ गडी राखून मात – देवगिरी कॉलेज मैदानावर झालेल्या सामन्यात लिटल फ्लॉवर हायस्कूलचा डाव १६.२ षटकांत ८५ धावांवर संपुष्टात आला. असाद युनूस सैयदने सर्वाधिक २६ धावा केल्या. पोदारतर्फे सर्वेश पवार व शौर्य चव्हाण यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. विजयाचे आव्हान पोदार संघाने १०.२ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार जय विष्णू जाधवने २४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह धडाकेबाज ३९ धावा फटकावल्या.

नाथ व्हॅलीचा ८ गडी राखून सहज विजय –
दुसऱ्या सामन्यात चाटे इंग्लिश स्कूलने २० षटकांत ९ बाद ११२ धावा केल्या. अनिश शिंदेने २५ व आदी पाटील याने २४ धावांचे योगदान दिले. नाथ व्हॅलीकडून श्लोक भारतीयने ३ तर चिन्मय श्रीवास्तव व शिवेन अग्रवाल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात नाथ व्हॅलीने अवघ्या ८.२ षटकांत २ बाद ११३ धावा करून विजय मिळवला. कर्णधार स्वरीत दरकने २३ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५२ धावांची तुफानी खेळी केली, तर चिन्मयने नाबाद ३४ धावा फटकावल्या.

केंब्रिजचा ५ गडी राखून विजय –
स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलने २० षटकांत ९ बाद १०५ धावा केल्या. देव पटेलने ३४ चेंडूंत ४१ धावांची खेळी केली. केंब्रिजतर्फे जयेश कावळेने १५ धावांत ३ तर इशांक काळवणे व श्लोक जोशी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात केंब्रिज संघाने १४.४ षटकांत ५ बाद १०८ धावा करून विजय मिळवला. पार्थ मरकडेने नाबाद २८ तर करक भारद्वाजने २४ धावा केल्या.

वुडरिजचा थरारक १ गडी राखून निसटता विजय –
एडीसीए मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात एस बी हायस्कूलने २० षटकांत ७ बाद १३० धावा केल्या. अनुज देव व एकलव्य मोंढेकर यांनी प्रत्येकी ३७ धावा केल्या. वुडरिजतर्फे आरव आतकरे व अर्चित देशमुख यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना वुडरिजने १७ षटकांत ९ बाद १३१ धावा करत विजय खेचून आणला. शौर्य राठोडने ३८ व आरवने २६ धावा केल्या. एस बी कडून रिदम साहुजीने ४ तर तन्मय रोजेकरने ३ बळी मिळवले.

आर जे इंटरनॅशनल व लिटल एंजल विजयी –
इतर सामन्यांत आर जे इंटरनॅशनलने ९६ धावांचा बचाव करताना गायकवाड ग्लोबल हायस्कूलला ८६ धावांवर रोखून १० धावांनी विजय साकारला. ओंकार पगारियाने ४१ धावांची खेळी केली, तर अथर्व मोकाशीचे ५ बळी व २५ धावा व्यर्थ ठरल्या. आर जे कडून साईराजने ४ तर विहान शानभागने ३ बळी घेतले.
तसेच लिटल एंजल इंग्लिश स्कूलने देवगिरी ग्लोबल हायस्कूलवर २ गडी राखून विजय मिळवला. देवगिरी ग्लोबलचा संघ ४८ धावांत गारद झाला. अश्विन बोरसेने ४ बळी टिपले. अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना बोधिरत्नने ४ बळी घेऊन कडवी झुंज दिली, मात्र लिटल एंजलने ११.४ षटकांत ८ बाद ५१ धावा करत निसटता विजय मिळवला.
या मान्यवरांची होती उपस्थिती –
या स्पर्धेचे मुख्य संयोजक विशाल लोळगे यांनी आजीव सभासद व मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. गुरुवारी झालेल्या सामन्यांना माजी सचिव अशोक काळे, आजीव सभासद चक्रधर दळवी, नित्यानंद भोगले, किरण देशपांडे, विशाल पांडे, शंकर शिंदे, सुशील वकील, दीपक जोशी, अजय श्रॉफ, महेंद्रसिंग कानसा यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. तसेच सचिव शिरीष बोराळकर यांनी सामनावीर पुरस्कार प्रदान करुन खेळाडूंनी चमकदार कामगिरीत सातत्य ठेवावे असा कानमंत्र दिला.
या प्रसंगी कार्यकारिणी सदस्य हेमंत मुळे, निखिल मिटकर, सहसचिव करण डोगरा, आजीव सभासद अरुण गुदगे, वरिष्ठ खेळाडू दिनेश कुंटे, टुर्नामेंट चेअरमन राहुल टेकाळे, विद्याधर पांडे, अक्षय गोयल, सय्यद आदिल, अनिरुद्ध शास्त्री, लोकेश तायडे, गंगाधर मोदाळे, प्रसाद कुलकर्णी, आसेर सिद्दिकी आदी उपस्थित होते.
