October 3, 2026

  1. वाळुज महानगर – छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात येणाऱ्या वडगाव (कोल्हाटी), तिसगाव, सहजापूर, पंढरपूर, करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर या 5 तसेच गंगापूर तालुक्यातील रांजणगाव (शेणपुंजी), वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपुर, अंबेलोहळ व तुर्काबाद (खराडी) या 7 अशा एकूण 12 गावाच्या ग्रामपंचायतीची मिळून नगरपरिषद स्थापन करण्याच्या दिशेने प्रशासकीय हालचाली सुरू आहे. त्यासाठी संबंधित विभागांकडून विनाविलंब अहवाल मागविण्यात आला आहे.

याबाबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वाळूज परिसरातील वडगाव (कोल्हाटी), तिसगाव, सहजापूर, पंढरपूर, करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर तसेच गंगापूर तालुक्यातील रांजणगाव (शेणपुंजी), वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपुर, अंबेलोहळ व तुर्काबाद (खराडी) या ग्रामपंचायतीची मिळून नगरपरिषद स्थापन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी, वैजापूर, तहसीलदार छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर, गट विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर, नगररचना शाखा, छत्रपती संभाजीनगर यांना 1 ऑक्टोबर 2026 रोजी लेखी आदेश देऊन अभिप्रायासह अहवाल विनाविलंब मागितला आहे.
नगरपरिषद स्थापनेसाठीची माहिती –
वाळुज परिसरातील ज्या बारा गावात नगर परिषद स्थापन करण्यात येणार आहे. त्या गावातील सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, सध्यस्थितीत अंदाजीत लोकसंख्या, कृषक व अकृषक जमीन, रोजगाराची टक्केवारी, सध्यस्थितीत कार्यरत शासकीय, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायतीची माहिती, दळणवळण व्यवस्था, विविध व्यवसाय, राष्ट्रीकृत, खाजगी बँका व परिसरात असलेल्या सोईसुविधा याबाबतची सर्व अद्यावत आकडेवारी व सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया – 1) नगरपरिषदेला अंतिम स्वरूप मिळावे –
नगरपरिषद होणे ही माझी मागणी असली तरी ती संपूर्ण परिसराच्या विकासाशी संबंधित बाब आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचतो. याचा हा सकारात्मक अनुभव आहे. आता सुरू झालेली प्रक्रिया पुढील टप्प्यांपर्यंत जाऊन नगरपरिषदेच्या मागणीला अंतिम स्वरूप मिळावे, यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील,” अशी प्रतिक्रिया रांजणगाव (शेणपुंजी) येथील
नगरपरिषदची मागणी करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा लोहकरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया -2) सकारात्मक पावलाचे मनापासून स्वागत –
नगर परिषद किंवा नगरपालिका स्थापन झाल्यास परिसराला स्वतंत्र व सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था मिळेल. आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होतील, नागरिकांची कामे अधिक सुलभतेने होतील तसेच मालमत्ता कर, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे यांसारख्या मूलभूत सेवांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे सिडको वाळूजमहानगरसाठी नगर परिषद/नगरपालिका स्थापन करण्याच्या या सकारात्मक पावलाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. अशी प्रतिक्रिया तिसगावचे माजी उपसरपंच नागेश कुठारे यांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *