
वाळूजमहानगर ता.6) – दुचाकीवर जाणाऱ्या 35 वर्षीय महिलेच्या गळ्यातील अडीच ग्रॅम सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी हिस्कावून नेले. ही घटना मंगळवारी (ता.4) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बजाजनगर ते सिडको वाळूज महानगर 1 च्या भर रस्त्यात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रज्ञा प्रविण क्षिरसागर (वय 35) रा. स्वामी विवेकानंदनगर प्लॅट नं. 22, गट नं. 140, वाळूज महानगर-1 यांचे कंदील हॉटेलच्या बाजुला लहान मुलांच्या कपडयाचे दुकान आहे. त्यांचे पती प्रविण क्षिरसागर हे जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनी मध्ये नोकरी करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता.4) रोजी दुकान बंद करून प्रज्ञा क्षीरसागर या पार्थ क्षिरसागर (वय 14) व तिर्थ क्षिरसागर (वय 10) असे रात्री 8 वाजता अँक्टीवा दुचाकीवर बसुन दुकानाकडून घरी जात होत्या. पाठीमागून अंदाजे 20 ते 25 वयोगटातील सडपातळ बांधा असलेले दोन अनोळखी इसम स्प्लेन्डर दुचाकीवर आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने प्रज्ञा क्षीरसागर यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठन बळजबरीने हिस्कावून नेले. चोर चोर म्हणत त्यांचा पाठलाग केला. परंतु ते राजमाता जिजाऊ चौकाच्या दिशेने पळुन गेले. सिडको वाळूज महानगर 1 येथील शिवाजी चौक, सहारा बिल्डींग जवळील मोकळ्या प्लॉटच्या रोडवर रात्री 8.10 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रज्ञा क्षीरसागर यांच्या गळ्यातील 2.5 ग्रँम (अडिच तोळे वजनाचे ) सोन्याचे मिनी गंठण हिस्कावून नेले. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळसूत्र हिस्कावणाऱ्याची हिंमत वाढली –
वाळूज परिसरातील मंगळसूत्र हिस्कावण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय रिकव्हरी अत्यंत नगण्य असून चोरटे मोकाट फिरत आहे. शिवाय सोन्याचे दर 61 हजाराच्या पार झाले आहे. त्यामुळे मंगळसूत्र हिस्कावणार्यांची हिम्मत वाढली आहे. परिणामी येथील महिलांमध्ये कमालीची अशांतता पसरली आहे.
