
वाळूजमहानगर, (ता.1) -पाच लाखासाठी एका 28 वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता.1) सकाळी 9 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे उघडकीस आली. या खुन प्रकरणी सासरच्या चार जणाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता शामसिंग महेर रा.लाखेगाव, ता.पैठण हिचा 2017 मध्ये रांजणगाव (शेणपुंजी) येथील मदन बाबुसिंग बेडवाल याच्या सोबत विवाह झाला होता. सुनिता हिचा पती मदन हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करत होता. लग्नानंतर सासरच्या मंडळीनी सुनिताचा पैशासाठी छळ सुरु केला होता. काही दिवसांनी मुलगा आर्यन याचा जन्म झाल्यानंतर सासरच्या मंडळीचा छळ थांबेल, या आशेमुळे सुनिता ही सासरच्या मंडळीचा त्रास सहन करीत होती. सासरच्या मंडळीकडून छळ सुरु असल्याने तिच्या माहेरच्या मंडळीनी सुनिता हिस फ्रीज व स्कुटी खरेदी करुन जावई मदन बेडवाल यास दिली होती. मात्र पती मदन बेडवाल याने पुन्हा 5 लाख रुपये घेऊन ये, असा तगादा पत्नी सुनिता हिच्याकडे सुरु केला होता. सुनिता पैसे आणत नसल्याने सासरच्या मंडळीकडून तिला टोमणे मारुन तिचा छळ सुरु केला. काही दिवसापुर्वी मदन हा मुलगा आर्यन यास सोबत घेऊन घरातुन बेपत्ता झाला होता. मुलाला घेऊन पती बेपत्ता झाल्याने सुनिता हिने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर काही दिवसांनी मदन हा मुलासह घरी परतला होता. 
गळा आवळून केला खून–
गुरुवारी रात्री मदन याचा पत्नीसोबत पैशावरुन वाद झाला होता. या वादानंतर सासरच्या मंडळीनी सुनिता हिस बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर मदन याने पत्नी सुनिता हिचा गळा आवळून खुन केला. सुनिता निपचित पडल्यानंतर सासरच्या मंडळीनी तिला पलंगावर टाकुन निर्धास्त झाले होते. शुक्रवारी (ता.1) सकाळी देवदर्शनासाठी गेलेल्या सुनिता हिची बहिण संगिता बारवाल हिस शेजा-यांनी तिचा खुन करण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर तिने या प्रकाराची माहिती भाऊ संजय मेहर यास दिली. या माहितीनंतर संगिता हिच्या माहेरच्या मंडळी रांजणागावात आले असता त्यांना सुनिता हिस मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केल्याचे समजले. या प्रकरणाची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोनि. कृष्णा शिंदे, सहायक पोनि गौतम वावळे उपनिरीक्षक सचिन पागोटे, आशोक इंगोले, शिवाजी घोरपडे, संदिप शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
चार जणाविरुध्द गुन्हा –
सुनिता हिचा सासरच्या मंडळीनी 5 लाखासाठी मारहाण करुन तिचा गळा आवळून खुन केल्याची फिर्याद तिचा भाऊ संजय महेर याने दिली आहे. यावरुन सुनिता हिचा पती मदन बेडवाल (30) सासु रुखमबाई बेडवाल (58), सासरा बाबुसिंग बेडवाल (62) व दिर रामेश्वर बेडवाल (24) सर्व रा.रांजणगाव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
