
वाळूजमहानगर, (ता.17) – एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर छापा टाकून एका 24 वर्षीय परप्रांतीय तरुणीची सुटका केली. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या हॉटेलचालकास जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई वाळूज औद्योगिक वसाहतीतील हॉटेल गुडलक येथे शुक्रवारी सांयकाळी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने केली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुडईअर कंपनीसमोर असलेल्या हॉटेल गुडलक मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली होती. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक सुषमा पवार, पोहेकॉ.बाबासाहेब काकडे, पोहेकॉ.त्रिभुवन, पोहेकॉ.खरे, पोकॉ.धिरज काबलिये, चिंचोळकर आदींच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून या हॉटेलवर सांयकाळी 4 वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी हॉटेलात असलेल्या पिडीत तरुणीची विचारपुस केली असता तिने आपण पश्चिम बंगालमधील लालबाग कलकत्ता येथील रहिवाशी असल्याचे पथकास सांगितले. हॉटेलचालक कुणाल पाटील याने आपण ग्राहकाकडून 1400 रुपये घेऊन यातील 700 रुपये रुमभाडे उर्वरीत 700 रुपये पिडीत तरुणीस देत असल्याची कबुली दिली. आरोपी हॉटेलचालक कुणाल पाटील याच्याजवळ मिळून आलेल्या दोन फोनची पाहणी केली असता त्यात अनेक महिलाचे फोटो मिळून आले असून हे फोटो आंबट शौकिन ग्राहकांना व्हॉटसअप पाठवित असल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यातुन दोन मोबाईलसह 41 हजार 474 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
—————-
