March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.4)- भरधाव जाणाऱ्या एका ओम्नी कारला अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ कार थांबवली. दरम्यान वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना रविवारी (ता.4) रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील तिरंगा चौकात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पांढऱ्या रंगाची ओमनी कार (एम एच 20, वाय -2292) ही रविवारी (ता.4) रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास पंढरपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. या धावत्या ओमनी कारला अचानक आग लागून वायरिंग जळाली त्यामुळे धूरचधूर झाला.

प्रसंगावधान राखत चालकाने गाडी थांबवली. दरम्यान हाकेच्या अंतरावर असलेले वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके, पोलीस अंमलदार पी एम कायंदे, देविदास दहिफळे, विकास कांबळे, किशोर साळवे, इमरान अख्तर, प्रदीप कांदे आदींनी धाव घेतली. दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे पि के चौधरी, के टी सूर्यवंशी, एच डी काळे, एस बी महाले आदींनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

या ओमनी कार मध्ये तीन प्रवासी होते. मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती वाळूज वाहतूक शाखेचे पी एम कायंदे व वाळूज अग्निशमन विभागाच्या नियंत्रक कक्षातून चिंतामण साळवे यांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *