
वाळूजमहानगर, (ता.21) – वाळूज औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओॲसिस (तिरंगा) चौक व कामगार चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. अपघाताबाबत उपाययोजना होत नसल्यामुळे या चौकात लहान मोठे अपघात दररोज होतात. या चौकाने अनेकांचे बळी घेतले असून कित्येकांना अपंगत्व आलेले आहेत. मात्र संबंधित प्रशासनाचे यावर उपाययोजना करण्याकडे अत्यंत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील वाळूज येथे औद्योगिक वसाहत आहे. वाळुज औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडून पहिलाच ओॲसिस
(तिरंगा) चौक लागतो. तर पुण्याकडून येताना चौक कामगार लागतो. महामार्गावर असलेल्या या दोन्ही चौकातून वाळूज औद्योगिक वसाहतीत प्रवेश केल्या जातो. त्यामुळे या दोन्ही चौकांना वाळूज औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाते. महामार्गावरील वाहने व वाळूज औद्योगिक वसाहतीतील वाहने या दोन्हीही चौकात एकत्र येत असल्याने येथे दररोज सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असते. वाट काढता काढता वाहनधारकांच्या नाकी नऊ येतात. वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याने अनेकदा अपघात होतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्याच्या तुलनेत वाहनांची वाढलेली भरमसाठ संख्या होय. येथे नेहमी होणाऱ्या अपघातात अनेक जणांचे बळी गेले असून कित्येक जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहेत. सतत होणाऱ्या या अपघातामुळे वाहनधारकांसह कामगार व नागरिक त्रस्त आहेत.
उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष –
या दोन्ही चौकात सकाळ संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होते. त्यातून अपघात होतात. त्यामुळे जखमींना उपचारार्थ दाखल करण्यापासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागते. त्यासाठी या चौकात वाहतूक पोलिससुध्दा तैनात असतात. मात्र अपघाताबाबत उपाययोजना, सूचना करण्याबाबत पोलीस प्रशासन तसेच उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यास एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
सर्विस रोडचे भिजत घोंगडे –
वाळुज परिसरातील काही भाग सिडकोच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे सिडकोने छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूने सिडको वाळूज महानगर -1 पासून वाळूज गावापर्यंत सर्विस रोडचे काम हाती घेतले होते. या सर्विस रोडचे काम काही ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. मात्र ज्या ओॲसिस (तिरंगा) चौक व कामगार चौकात अपघात होतात. किंवा अपघाताबाबत उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. त्याच ठिकाणी सर्विस रोडचे काम रखडले आहे. या सर्विस रोडच्या भिजत घोंगड्यामुळेही या चौकातील अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
तिघांचा संगम होणार का नाही-
ओॲसिस (तिरंगा) चौक व कामगार चौक हे दोन्ही अपघातग्रस्त चौक वाळूज औद्योगिक वसाहत, सिडको प्रशासन व वाळूज वाहतूक शाखेच्या अत्याधित येतात. या तिघांनी मिळून येथील अपघाताबाबत उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र या तिघांचा संगम होणार की नाही? त्याबाबतचा प्रश्न अनुत्तरिय आहे.
