
वाळूजमहानगर, (ता.14) – राहत्या घरात अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्यासह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना रविवारी (ता.14) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वाळूज महानगरातील गट नंबर 105 मधील नमन विहार फ्लॅट नंबर 2 मध्ये घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुदाम पोफळे हे कुटुंबासह तिसगाव परिसरातील असलेल्या नमन विहार सोसायटीमध्ये राहतात. सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरास अचानक आग लागली. त्यावेळी पोफळे हे कामानिमित्त बाहेर गेलेले होते. आग लागल्याचे लक्षात येताच पोफळे यांच्या पत्नी व दोन मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे रवींद्र पवार, अंकुश लेंडाळे, अरुण मडे, दिलीप खंबाट, किशोर पोटे यांच्यासह नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पुंडलिक डाके, पोलीस अंमलदार विजय पाटील, लखन दुशिंगे, बबलू थोरात, संजय पवार, मंगेश मनोरे, 108 रुग्णवाहिका चालक मंगल राठोड, डॉ. अभिजित इप्पर यांनी घटनस्थळी धाव घेतली.
ही माहिती अग्निशमन विभागला कळताच छत्रपती संभाजीनगर येथील व वाळूज एमआयडीसी येथील अशा दोन अग्निशमन गाडी दाखल होऊन आग विझवण्यात आली. या आगेचे कारण अद्याप स्पष्ट नसून आगीमध्ये फर्निचर, कपडे, इलेक्टॉनिक साहित्यासह इतर साहित्य जाळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट नसले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
