
वाळूजमहानगर, (ता.12) – महाराष्ट्र राज्य क्रीडा निमित्ताने बजाजनगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन 14 जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील झपाट्याने वाढणाऱ्या बजाजनगर परिसरात अनेक उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट प्रशिक्षक देखील आहेत. या खेळाडूंना एक क्रीडा व्यासपीठ निर्माण व्हावे. या उद्देशाने ऑलम्पिक वीर स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने प्रथमच 15 जानेवारी हा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निमित्ताने बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्या वतीने प्रथमच बजाजनगर येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धा 14 व 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या बाद पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धा रविवारी (ता.14) जानेवारी रोजी हनुमान मंदिर, आकार टूल कंपनीसमोर, इंद्रप्रस्थ कॉलनी बजाजनगर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. यासाठी वाळूज परिसरातील 22 शाळा, महाविद्यालयांनी आतापर्यंत आपल्या संघाची नोंदणी केली आहे. जवळपास 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असणार आहे. या स्पर्धेसाठी बजाजनगर परिसरातील जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. 
सहभागी खेळाडूंना व विजयी संघांना प्रमाणपत्र, मेडल, व चषक (ट्रॉफी) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी 8 वाजता सुरू होणार असून ही स्पर्धा दिवसभर चालणार आहेत. परिसरातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धा पाहण्याचा आनंद घ्यावा. असे आव्हान बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास जाधव यांनी केले आहे.
