
वाळूजमहानगर, (ता.15)- मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेलेले बहिण भाऊ खोल खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता.15) रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.

बजाजनगर येथील तानाजी सरडे यांच्या रूममध्ये विद्या राहुल देशमुख (35), मुलगी चैताली (वय 11) व समर्थ (7) यांच्यासह राहत असत. चैताली की चौथी तर समर्थ हा दुसऱ्या वर्गात असून ते दोघेही बजाजनगर येथील स्वामी विवेकानंद शाळेत शिकत होते. शुक्रवारी (ता.15) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चैताली व समर्थ हे दोघे भाऊबहीण खेळण्यासाठी बजाजनगरातील भूखंड क्रमांक पी -37 मधील एका प्रार्थना स्थळाजवळ गेले होते. या प्रार्थना स्थळाच्या पाठीमागे मोठा खड्डा असून या खड्ड्यात ड्रेनेज व पावसाचे पाणी साचलेले आहे. या खड्ड्याजवळ खेळ खेळत असताना चैताली व समर्थ हे दोघे खड्ड्यात पडले. त्यांच्यासोबत सोबत असलेल्या रविराज विकास सबर याने आरडाओरडा केला. मात्र घटनास्थळी कोणी नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. यानंतर रविराज याने धावत जाऊन लगतच्या मैदानावर खेळणाऱ्या काही तरुणांना ही माहिती सांगितली. त्यामुळे तरुणांनी घटनास्थळी जाऊन पाण्यात बुडालेल्या चैताली व समर्थ यांना पाण्यातून बाहेर काढले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित, बाळू लहरे, तुकाराम पवार, प्रियंका तळवंदे यांनी घटनास्थळी धाव घेत चैताली व समर्थ यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकाशवाणीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
