February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.14) – महावितरणच्या गंगापूर उपविभागाचे 14 दिवसांत विभाजन होणार असून वाळूजला नव्याने उपविभागाची निर्मिती केली जाईल. तसेच वाळूज शाखेचे विभाजन करून रांजणगाव येथे महावितरणच्या नवीन शाखेची निर्मिती करण्यात येणार आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.13) विधान परिषदेत केली.

महावितरणच्या गंगापूर (जि.छत्रपती संभाजीनगर) उपविभागावर ग्राहकांचा असलेला प्रचंड लोड लक्षात घेता या उपविभागाचे विभाजन करावे. या मागणीसाठी आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. भौगोलिकदृष्ट्या गंगापूर तालुका मोठा असून याठिकाणी महावितरणचा एकच उपविभाग आहे. त्यात विविध वर्गवारीच्या वीज ग्राहकांची संख्या 80 हजाराच्यावर असल्याने या उपविभागाचे विभाजन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गंगापूर उपविभागाचे विभाजन करून वाळूज येथे उपविभागाची निर्मिती करावी व वाळूज शाखेचे विभाजन करून रांजणगांव येथे नव्याने महावितरणच्या शाखेची निर्मिती करावी अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधीला सकारात्मक उत्तर देत गंगापूर उपविभागाचे येत्या 14 दिवसांत विभाजन केले जाईल. ज्यामध्ये गंगापूर उपविभागात 32 हजार 119 वीज ग्राहक असतील तर वाळूज येथील नवीन उपविभागात 48 हजार 308 वीज ग्राहक असतील. वाळूज शाखेचे विभाजन करून रांजणगांव येथे महावितरणच्या नवीन शोखेची निर्मिती करण्यात येईल. यासंदर्भातील सर्व कार्यवाही येत्या 14 दिवसांत पूर्ण केली जाईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या लक्षवेधीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे यांनी देखील सहभाग घेतला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *