वाळूजमहानगर, (ता.2) – वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच अपघात टाळून सुखकर प्रवास व्हावा. यासाठी वाळुज महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्विस रोड करण्यात येत आहे. मात्र भूसंपादन व कायद्याच्या कचाट्यात तो अडकला. परिणामी वाळूज औद्योगिक वसाहतीतील नागरिकांसह उद्योजक, कामगार तसेच नगर, पुण्यातकडे जाणार्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करत मोठी कसरत करून प्रवास करावा लागतो. तरीही दररोज लहान मोठे अपघात होतात. त्यामुळे जीव धोक्यात असल्याने सर्विस रोड पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढलेली औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळेच येथे लहान मोठे जवळ जवळ साडेतीन हजार कारखाने आहेत. कारखान्यांबरोबरच भारताच्या कानाकोपऱ्यातील कामगार या वसाहतीत येऊन स्थायिक झालेला आहे. परिणामी या परिसरात नागरी वसाहती वाढल्या.
त्यामुळे वाळुजसह छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या लाखो गणिक वाढली. त्या तुलनेत प्रवासी साधनेसुद्धा वाढली. दरम्यान वाळूज परिसरात सिडकोने वाळुज महानगर-1, 2, 3 व 4 ची निर्मिती केली. वाळूज औद्योगिक वसाहत व छत्रपती संभाजीनगरचा दररोज संपर्क येत असल्याने वाळुज औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गावर दररोज वाहनाची कोंडी होऊ लागली. आणि आजही ती होत आहे. ही वाहतुकीची कोंडी होऊ नये, नागरिकांसह उद्योजक, कामगार व अन्य वाहनधारकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून.
सिडको प्रशासनाच्या वतीने सर्विस रोडचा प्रस्ताव पारित करण्यात आला. 11 किलोमीटरचा हा सर्विस रोड मिलिटरी हद्दीपासून वाळुजगावापर्यंत असून तो पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूने आहे. अनेक ठिकाणी सर्विस रोडसाठी खडी टाकण्यात आली मात्र काम अपूर्णच ठेवले आहे. कामआनंद कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुमारे 4 वर्षापासून सुरू झालेल्या या सर्विस रोडचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
या सर्विस रोडचे काम अनेक ठिकाणी रखडलेले आहे. या सर्विस रोडसाठी संपादित करण्यात आलेल्या भूधारकांना योग्य मोबदला मिळत नसल्याने भूसंपादन रखडल्याने व अन्य कारणांमुळेही तो कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. 
प्रतिक्रिया – लघु उद्योजक,जनार्धन निकमपाटील- सर्विस रोड अभावी महामार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. नेहमी लहान मोठे अपघात होतात. यात अनेकांचे बळी गेले असून कित्येकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. वाळुज औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या जाणाऱ्यांची सुविधा व्हावी. वाहतूक कोंडीसह अपघाताच्या संकटातून मुक्ती मिळावी. म्हणून सर्विस रोडचे काम करणे खूप गरजेचे झाले आहे.
प्रतिक्रिया – सिडको प्रशासक, भुजंगराव गायकवाड –
हा सर्विस रोड सिडको वाळूज महानगर येथील साउथ सिटी ते वाळूजपर्यंत आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूने हा सर्विस रोड आहे. त्याची लांबी 11 किलोमीटर असून आनंद कन्स्ट्रक्शन काम करत आहे. बऱ्याच ठिकाणी या सर्विस रोडचे काम डांबरीकरणासह पूर्ण झालेले आहे. मात्र अनेक जण कोर्टात गेले असल्याने भूसंपादन संपादन झाले नाही. जमीन ताब्यात मिळताच सर्विस रोडचे काम पूर्ण करण्यात येईल.
