वाळूजमहानगर (ता.13) – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजारातून तसेच मॉल मधून खरेदी न करता अंध मुलींनी तयार केलेली उटणे खरेदी करून त्यांना आर्थिक हातभार लावून माणुसकी जपत एक प्रकारची दिवाळी भेटच दिली.
दिवाळी सणानिमित्त पालकांनी फटाके फोडण्यासाठी दिलेल्या पैशात बचत करून या विद्यार्थ्यांनी तिसगाव म्हाडा कॉलनीत असलेल्या अंधमुलींच्या प्रशिक्षण व पुनर्वसन प्रकल्पातील अंध मुलींनी दिवाळी निमित्त तयार केलेले उटणे खरेदी केली व या मुलींनी मदत केली. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहा रुपये एक पाकिटासाठी या प्रमाणे एक हजार तीन उटणे पाकिट खरेदी केली व दहा हजार तीस रुपये रोख दिले. या शाळेच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे हनुमान भोंडवे, अशोक लगड, विजय उखळे, राजेंद्र माने, पंडीत नवले व मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे हे नेहमीच अशा सामाजिक उपक्रमासाठी प्रोत्साहन देत असतात.
