February 5, 2026


वाळूजमहानगर (ता.11) – कोणतीही पूर्वकल्पना नसताना अनपेक्षितपणे मिळालेली भेटवस्तु, मिठाई आणि फटाके पाहून पारधी वस्तीवरील चिमुकली मुले आनंदल्याने पोलिसांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून आली. इतरांच्या सुखात आपले समाधान पाहण्याचा हा उपक्रम शुक्रवारी (ता.10) रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी राबवला.

पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीच्या सण, उत्सवालाला गुरुवारी (ता.9) पासून सुरुवात झाली. त्यामुळे सर्वत्र खरेदी व फटाक्याची धडामधूम सुरू आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्यांना हा सण साजरा करण्यास आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. नेमका हाच धागा पकडून वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या डोक्यात कल्पना आली. आणि आपल्या सहकाऱ्यांना आताशी धरत फटाके, भेटवस्तू आणि मिठाई खरेदी करून थेट वाळूज परिसरातील शंकर फाटा, विटावा, एकलहेरा, अंबेलोहळ येथील पारथी वस्ती गाठली. पोलिसांना पाहून वस्तीवरील महिला, पुरुष व मुले भाम्बवली. कोणताही गुन्हा केला नसतानाही पोलीस आल्याने आणि ते आता आपल्याला घेऊन जातील.

या विचारात असतानाच पोलीस पटापट गाडीतून खाली उतरले. आणि चिमुकल्यांच्या कानावर आवाज आला. ‘मुलांनो, इकडे या रे, मुले एकमेकांकडे कावरेबावरे पहात मोठ्या धैर्याने पोलिसांजवळ गेले. त्यानंतर पोलिसांनी सोबत आणलेले बॉक्स पुढे केले. कोणतीही पूर्वकल्पना नसताना अनपेक्षितपणे मिळालेली भेटवस्तु, मिठाई आणि फटाके पाहून पारधी वस्तीवरील चिमुकली मुले खूपच आनंदले. ते पाहून पोलिसांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही.

दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद पाहणारा हा अनोखा उपक्रम वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (ता.10) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राबविण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आघाव, दुय्यम निरिक्षक गणेश ताठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यु सानप, पोलीस अंमलदार योगेश शळके, अविनाश ढगे, विक्रम वाघ आदीनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *