February 5, 2026

वाळूजमहानगर (ता.03) – दोन तासापूर्वी जन्म झालेल्या एका पुरुष जातीच्या अर्भकाला सिमेंटच्या गोणीत घालून उसाच्या शेतात फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (ता.3) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एकलहेरा- नांदेड रोडवर उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एकलहेरा येथील रुखमनबाई गांगुर्डे या शुक्रवारी (ता.3) रोजी स्वतःच्या शेतात काम करीत होत्या. दुपारी 4 वाजेच्या सुमारास शेजारच्या उसाच्या शेतातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे रूखमनबाईंनी तेथे जाऊन पाहिले असता तेथे सिमेंटच्या एका गोणीत नवजात अर्भक अत्त्यवस्थेत दिसले.

              कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक शिंदे –
            
जिवंत अर्भक सापडल्याची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंदे, गणेश गिरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, तुकाराम पवार यांनी घटनास्थळी धाव घेत त्या अर्भकाला उपचारार्थ बजाजनगर येथील घृष्णेश्वर हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने या अर्भकाची प्रकृती ठीक आहे. हे केवळ पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाले. दरम्यान घृष्णेश्वर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर 108 रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे, डॉ. सुशील राऊत यांनी पोलिसांच्या मदतीने या नवजात अर्भकाला पुढील उपचारार्थ घाटीत दाखल केले.

   दोन तासापूर्वी झाला जन्म –
वाळुज एमआयडीसी परिसरातील एकलहेरा ते नांदेड रोडवर एका अज्ञात महिलेने मुलास जन्म दिला. मात्र ते तिला नकोसे असल्याने तिने सिमेंटच्या गोणीत घालून मरण्याच्या उद्देशाने 100 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात नेऊन फेकले. मात्र बाळाचे दैव बलवत्तर म्हणून रूक्‍मणबाई गांगुर्डे यांना त्याच्या रडण्याचा आवाज आला. आणि त्याला वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. जन्म होताच फेकून दिल्यानंतर अवघ्या दोनच तासात हा प्रकार उघडकीस आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *