
वाळूज महानगर, (ता.2) – मराठा समाजाच्या मागणीसाठी सर्वत्र मोर्चे, आंदोलने तसेच आमरण व साखळी उपोषणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाळूज परिसरातील बजाजनगर या कामगार वसाहतीत सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता.2) रोजी सायंकाळी भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी विविध घोषणांनी संपूर्ण बजाजनगर दणाणून गेले होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. शांततेत व लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या उपोषणाचा नववा दिवस होता.
तरीही सरकार दखल घेत नसल्यामुळे मराठा समाजातुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊन मनोज पाटील जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून वाळूज परिसरातील बजाजनगर येथे गुरुवारी (ता.2) रोजी रात्री साडेसात वाजता भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकातून सुरू झालेला हा भव्य कॅन्डल मार्च गणपती मंदिर, त्रिमूर्ती चौक,
मोहटादेवी मंदिर मार्गे हायटेक कॉलेज जवळील शिवस्मारका जवळ गेला. दरम्यान एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, जय भवानी जय शिवराय, शिवाजी महाराज की जय. अशा विविध घोषणांनी परिसर जणांना होता. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होऊन मराठा आरक्षणाविषयी विविध घोषणा देण्यात येऊन या कॅन्डल मार्चची सांगता झाली.
