February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.29) – काँग्रेस पक्षाचे वाळुज महानगर अध्यक्ष अर्जुन शेषराव आदमाने यांनीही काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर (पश्चिम)चे तालुका अध्यक्ष सर्जेराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्हाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा शनिवारी (ता.28) रोजी सुपूर्द केला आहे.

या राजीनामन्यात अर्जुन शेषराव अदमाने यांनी म्हटले आहे की, मी काँग्रेस पक्षाच्या वाळुज महानगर अध्यक्ष या पदावर काम करीत होतो. परंतु आता मागील काही दिवसांपासून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आमरण उपोषण चालू केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजातील अनेक तरुणांनी आजपर्यंत आत्महत्या केलेली असून समाजातील तरुण पिढी उदिग्न झालेली आहे. त्यामुळे आता मोठया प्रमाणात मराठा आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण मराठा समाज बांधव एकजुटलेला आहे. तसेच मराठा समाजा व्यतिरिक्त दुस-या समाजातील समाज बांधव मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असताना सत्ताधारी पक्षातील तसेच विरोधी पक्षातील कुठलाही मंत्री, आमदार, खासदार जाहीर पाठींबा देत नाही. काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करीत आहे. असे असताना मी त्यांच्या नेतृत्वात आपल्या काँग्रेस पक्षाचे काम करु इच्छित नाही. आपण जिल्हाध्यक्ष म्हणून माझा आपल्या विषयी कुठलाही राग किंवा व्देष नाही, तुमचा सुध्दा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, शक्य झाल्यास तुम्ही सुध्दा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून समाजाला पाठींबा दयावा. अशी विनंती केली आहे. मराठा आरक्षणाला वरिष्ठांचा विरोध असल्यामुळे मी राजीनामा देवून पूर्ण वेळ जरांगे पाटील यांना समर्थन देवून आरक्षण मिळण्यासाठी काम करणार आहे. आता नाही तर कधीच नाही, एकच मिशन मराठा आरक्षण. असेही या राजीनामा पत्रात नमूद आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *