
वाळूजमहानगर, (ता.8) – जय भोले, बाबा बर्फानी अशा घोषणा देत अमरनाथ यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर, वाळूज, आपेगाव येथील पहिला जथ्था 27 जुन रोजी तर दुसरा जथा बुधवारी (ता.5) जुलै रोजी दुपारी सचखंड एक्सप्रेसने रवाना झाला. त्यातील पहिला जथ्था दर्शन घेऊन सुखरूप घरी पोचला. 
काश्मीरचे अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह वाळूज परिसरातील भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. 
अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालेल्या पहिल्या जथ्थ्यात
आपेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथून भागिनाथ रोकडे, अशोक धनुरे, मनोज थोरे, मच्छिंद्र जाधव, हनुमान आढाव, परसराम आढाव यांचा तर वाळुज येथील पोपटराव केरे, दिलीप अवताडे, संदीप कुटे, महादेव शिंदे, राधेश्याम कणसे, बंडू केरे या यात्रेकरूंचा जथ्थ्यात समावेश आहे. पहिल्या जथ्थ्याने सोमवारी (ता.3) जुलै रोजी मोठ्या उत्साहात व जय भोलेच्या गजरात भक्ती भावाने दर्शन घेतले. 
दुसऱ्या जथ्थ्यात नंदु सोनवणे, रामा सोनवणे, तुळशिराम दाणे, सुनिल लडोल, संतोष कुंजारे, संतोष बिलवाल, योगेश जगदाळे, दिनेश अभंग, रोहित श्रीमाळी, करण वैषणव, संकेत करमसे हे भाविक बुधवारी (ता.5) रोजी रवाना झाले. त्यांचे दर्शन सोमवारी (ता. 10) रोजी होणार आहे. 
एक जुलै 2023 पासून सुरू झालेली ही अमरनाथ यात्रा सप्टेंबर पर्यंत म्हणजेच शिवलिंग वितळेपर्यंत सुरू राहणार आहे. सरासरी यात्रेचा काळ दोन महिन्याचा असतो. यात्रेदरम्यान सैन्य दलाचा कडेकोट बंदोबस्त असतो. बालटाल व पहलगाम अशा दोन मार्गाने ही यात्रा असते. यात्रेकरूंना सोयीस्कर होईल असा मार्ग यात्रेकरू अवलंबतात. 
यात्रेदरम्यान निसर्गरम्य वातावरणासह बर्फाचा आनंद भाविक जय भोलेच्या गजरात घेतात. त्यामुळे या अमरनाथ यात्रेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
