March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – दररोज काम करूनही गेल्या चार महिन्यापासून पगार रखडला. त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या दारातच ठिय्या मांडून आंदोलन केले. मात्र ग्राम विकास अधिकारी व प्रशासक यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कर्मचाऱ्यांनी नमती घेतले. हा प्रकार जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता.15) रोजी घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की वाळुज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी ग्रामपंचायत ही आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षम मानली जाते. येथील सरपंच गजानन बोंबले व उपसरपंच प्रवीण दुबिले यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याने येथे प्रशासकाची नियुक्ती आहे. जोगेश्वरी, नायगाव – बकवालनगर, कमलापूर, रामराई व रामराईवाडी या पाच गावांची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथे स्वच्छता, पाणी पुरवठा, लिपिक अशा विविध पदावर जवळजवळ 58 कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जवळजवळ नऊ लाख रुपये खर्च होतो.

हा पगार ग्रामपंचायत ग्राम निधीतून दिला जातो. परंतु ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या डबघााईस आल्याने येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चार महिन्यापासुन पगार नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेळोवेळी मागणी करूनही पगार मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी होती. बुधवारी (ता.15) रोजी कर्मचाऱ्यांनी पगाराची मागणी केली. मात्र तो न मिळाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दुपारी दोन वाजेपासून अचानक काम बंद आंदोलन पुकारले. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी सतीश देवकर, अशपाक बेग, किशोर गांगवे, रोहिदास शिंदे, ज्ञानेश्वर काजळे, गणेश वाकचौरे, लाला कुराडे आदींसह जवळजवळ सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते.

त्यामुळे प्रशासक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढून तीन चार दिवसात पगार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नमती भूमिका घेत पुन्हा कामावर रुजू झाले.

तिजोरीत खडखडाट
वाळूज औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येतात. या कंपन्यांचा कर स्वरूपात मोठा आर्थिक फायदा ग्रामपंचायतला होत होता. मात्र ग्रामपंचायतीला मिळणारा अर्धा कर एमआयडीसीकडे वळवण्यात आला. शिवाय कर वसूल करण्याचे अधिकारही गेले. परिणामी ग्रामपंचायत डबघाईस येऊन तिजोरीत खडखडाट झाला. जोगेश्वरी प्रमाणेच वाळूज परिसरातील अन्य ग्रामपंचायतीची सुद्धा अशीच गत झाली आहे.
—————-

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *