February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.30) – बहिणीला पळवून आणून आंतरजातीय विवाह केला. तसेच ती त्याच्यापासून विभक्त झाली. याचा राग मनात धरून धारदार कुर्हाडीने अक्षरश: लाकडासारखे मेहुण्याला तोडून निर्घृण खून केला. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी आंतरजातीय साल्याला पोलिसांनी अवघ्या तीन तासात पकडून जेरबंद केले. सैराट चित्रपटा सारखीच ही घटना वाळूज परिसरातील इसारवाडी फाटा येथे गुरुवारी (ता.29) रोजी दुपारी 4.45 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबासाहेब उर्फ बापु छबु खिल्लारे वय 30 वर्षे याने 5 वर्षापुर्वी श्यामराव नाटकर रा. भोकर ता. श्रीरामपुर जि. नगर यांची मुलगी हिनाला पळवून नेऊन तिच्याशी आतरंजातीय विवाह केला होता. लग्नानंतर एक मुलगा झाला, तो आजारी पडल्याने मयत झाला. बाबासाहेब खिल्लारे हा पत्नीसह प्रवारासंगम, ता. नेवासा येथे राहावयास होता. एक वर्षापुर्वी त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे बाबासाहेब यांची पत्नी विभक्त झाली. काही दिवसापुर्वी बाबासाहेब व त्याचे आई वडील यांच्यामध्ये पैशावरुन किरकोळ वाद झाल्याने बाबासाहेब याला मोठा भाऊ नंदू खिल्लारे व भावजई शोभा यांनी दोन तिन दिवसासाठी सारंगपूर येथे घरी बोलावले होते. त्यामुळे बाबासाहेब हा मंगळवारी (ता.27) रोजी दुपारी 4 वाजता सारंगपूर येथे आला होता. सारंगपूर ही नंदू खिल्लारे याची सासुरवाडी आहे. तेथे राहून तो इसारवाडी फाटा येथे हुरडा विक्रीचा व्यवसाय करतो. गुरुवारी (ता.29) रोजी 12 वाजेपासुन नंदू खिल्लारे, शोभा खिल्लारे हे पतीपत्नी व दिर बाबासाहेब असे इसारवाडी फाटा, औरंगाबाद नगर रोडच्या कडेला ज्वारीचा हुरडा विक्री करीत होते. दुपारी नंदू हा ढोरेगाव येथे कामानिमित्त गेला होता.

चहा पितानाच आला काळ
बाबासाहेब हा दुपारी 4.45 ते 5 वाजेच्या सुमारास रामनाथ पाटील यांच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला. तो चहा पीत असतानाच तेथे आरोपी सचिन श्यामराव नाटकर वय 25 रा. भोकर ता. श्रीरामपूर हा काळरुपी आला. त्याने बाबासाहेब खिल्लारे याला कुऱ्हाडीने मारहाण करून अक्षरश: लाकडासारखे तोडले. खिल्लारे हा ठार झाल्याची खात्री होताच आरोपी सचिन नाटकर याने हातातील कुर्हाड वर करुन विजयाचा जल्लोष करत दुचाकीवर बसुन नगरच्या दिशेने पळुन गेला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेनंतर तेथे लोकांची गर्दी जमा झाली. त्यामुळे वाहतुकीची ही कोंडी झाली. दरम्यान ही माहिती समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी ढोले, पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांची तात्काळ मदत
भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य केले. 108 रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे यांनी सामाजिक कार्यकर्ता गणेश राऊत यांच्या मदतीने बाबासाहेब खिल्लारे याला घाटीत दाखल केले. याप्रकरणी शोभा नंदू खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी सचिन शामराव नाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन तासात आरोपी जरबंद
घटनेनंतर आरोपी नाटकर हा दुचाकी वरून फरार झाला. मात्र वाळूज पोलिसांनी त्यास पकडून अवघ्या तीन तासात शेअर बंद केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू सानप, पोलीस कॉन्स्टेबल किशोर साबळे, जगदीश खंडाळकर, श्रीकांत सपकाळ यांच्या पथकाने केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *