वाळुज महानगर – शाबुदाणा खिचडी खाण्यासाठी बोलावून एका युवकावर रिक्षा चालकाने धारदार कुकरीने हल्ला केला. ही गंभीर घटना 17 जानेवारी रोजी दुपारी वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे घडली.
याबाबत पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जोगेश्वरी येथील सुशिल बसता नवघरे वय 29 हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. शनिवारी 17 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता आरोपी अमोल भानुदास शिंदे (रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) याने नवघरे याला खिचडी खाण्यासाठी घरी बोलावले. तो त्याच्या घरी गेला असता अमोल शिंदे याने “तू माझ्या रिक्षाला हात लावला, तू जादू केलीस त्यामुळेच माझी रिक्षा सुरू होत नाही” असा आरोप करत वाद घातला. यावेळी सुशील नवघरे हा समजावून सांगत असतानाच शिंदे याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच कुकरीने सुशील नवघरे यांच्या डाव्या गालावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकीही दिली. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मनोरे करीत आहेत.
