
वाळूज महानगर, (ता 14) – राज्यात नायलॉन मांजावर बंदी असतानाही बेलगामपणे होणारा वापर थांबताना दिसत नाही. याच निष्काळजीपणामुळे वाळुज परिसरातील रांजणगाव व बजाजनगर येथे बुधवारी 14 जानेवारी रोजी दोघे जखमी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत राहणारा रवी वामन काजळे हा नेहमी प्रमाणे दुचाकीवरून कामावरून घरी परतत होता. त्याचवेळी अचानक नायलान मांजा त्यांच्या चेहऱ्यावर घासला गेला. त्यामुळे काजळे हा रक्तबंबाळ होऊन रस्त्याच्या कडेला कोसळला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने बजाजनगरातील खाजगी दवाखान्यात हलविले. यावेळी त्यांच्या नाकाला व डोळ्याला खोल जखमा झाले तीन टाके पडले आहे. दुुसऱ्या घटनेत नरेंद्र शिंदे हा मकरसंक्रातीत निमित्त बाजरपेठेत घरघुगती समान आण्यासाठी गेला होता. समान घेऊन घरी येत असतांना मोहटादेवी चौक ते आयोध्यानगर या मुख्य रस्त्यावर अचानक त्याच्या गळ्यावर नायलान मांजा घासला गेला. यात तो जखमी होऊन त्यास तीन टाके पडले.
पोलिसांनी धडक कारवाई करावी –
राज्य शासनाने नायलॉन मांजा विक्री, उत्पादन आणि वापरावर स्पष्ट बंदी लागू केली असतानाही रांजणगाव, बजाजनगरसह अनेक ठिकाणी हा धोकादायक मांजा सहज उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करत बंदीचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
