
वाळूज महानगर, (ता.10) – यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची वाटचाल ही आता स्वायत्त महाविद्यालयाकडे होत असून “ज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेची त्रिवेणी हाच भविष्यातील खरा मंत्र आहे. या उपलब्धी मध्ये आजी व माजी विद्यार्थ्यांचे योगदान सर्वाधिक आहे.” असे स्पष्ट मत यश इन्स्टिट्यूटऑफ फार्मसीचे संचालक डॉ. सुभाष देवढे पाटील यांनी बुधवारी 7 जानेवारी रोजी व्यक्त केले.
सिडको वाळूज महानगर एक येथील यश इन्स्टिट्यूटऑफ फार्मसीला नुकत्याच मिळालेल्या UGC अंतर्गत 2(एफ) व 12(बी) मानांकनामुळे संशोधन, नवोपक्रम व अनुदानाच्या दालनांतील अनेक द्वारे संस्थेसाठी खुली झाली आहेत. या सर्व यशाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 7 जानेवारी रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थापक संचालक डॉ. सुभाष देवढे पाटील हे मार्गदर्शन करत होते. यावेळी ते म्हणाले की, श्रीमती ताईसाहेब कदम सेवाभावी फाउंडेशन व रिसर्च सेंटर, सोनई संचलित यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे केवळ एक शैक्षणिक संस्थान नसून, गुणवत्तेची साधना, संशोधनाची जिद्द आणि समाजप्रती असलेली बांधिलकी यांचे सशक्त प्रतीक बनले आहे. सन 2004 मध्ये रोवलेले ज्ञानाचे बीज आज एका भक्कम, सुसंस्कृत आणि दूरदृष्टीपूर्ण वटवृक्षात परिवर्तित झाले आहे. प्रारंभी बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी 60 प्रवेश क्षमतेसह सुरू झालेल्या या महाविद्यालयाने सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध प्रशासन आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाच्या बळावर आज 100 प्रवेश क्षमता प्राप्त केली. त्यासोबतच फार्मास्युटिक्स व फार्मास्युटिकल क्वालिटी अॅश्युरन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची यशस्वी वाटचाल सुरू असून, स्वतंत्र संशोधन केंद्रात पीएच.डी. विद्यार्थी नव संशोधनाचे दीप प्रज्वलित करत आहेत.गुणवत्तेच्या कसोटीवर यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने आपली ठाम मुद्रा उमटवली आहे. NAAC कडून नामांकन प्रमाणपत्र, ISO 21001:20018 हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (AAA) अर्थात ट्रिपल ए मध्ये मिळालेला ‘A’ ग्रेड ही संस्थेच्या शैक्षणिक प्रगल्भतेची साक्ष देणारी गौरवचिन्हे आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकसंघ प्रयत्न केले. महाविद्यालयाच्या या उपलब्धीसाठी संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख, शंकरराव गडाख, ताईसाहेब कदम सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय गडाख व मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी प्राचार्य व सहकाऱ्यांचे स्वागत केले आहे.
