
वाळूजमहानगर, (ता.15) – वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर या कामगार वसाहतीत पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने येथील वाहनधारक कामगार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या पेट्रोल चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे बजाजनगर या कामगार वसाहतीत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. येथील उद्योगधंदे रात्रंदिवस सुरू असल्याने कामगारांना फर्स्ट,सेकंड व थर्ड अशा तीनही शिफ्ट मध्ये काम करावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मालकीचे वाहन असणे आवश्यक आहे. म्हणून कामावर ये जा करण्यासाठी बहुतेक कामगारांकडे टू व्हीलर, फोर व्हीलर अशी स्वतःची वाहने आहेत. ही वाहने कामगार आपापल्या हाउसिंग सोसायटीमध्ये पार्क करतात. मात्र पार्किंग केलेल्या वाहनातून पेट्रोल चोरी होण्याचे प्रमाण सध्या वाढले असल्याने बजाजनगर येथील कामगार वर्गसह नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्याप्रमाणे वाहन चोरांची टोळी असते तशीच टोळी पेट्रोल चोरांची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या पेट्रोल चोरट्यांना तात्काळ पावबंद करावे. अशी मागणी करण्यात येत आहे.
वाहनधारकांची पोलिसात धाव –
कामगारांना रात्री बेरात्री केव्हाही कंपनीत ये जा करावी लागते. तसेच प्रत्येक वेळी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरणे शक्य नसते. म्हणून कामगार आपापल्या वाहनात मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरून ठेवतात. मात्र हे पेट्रोल चोरी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. सतत होणाऱ्या या पेट्रोल चोरीमुळे सारा गौरव हाउसिंग सोसायटी समोरील अपार्टमेंट, सारा वृदावन अपार्टमेंट, छत्रपती शिवाजी चौक बजाजनगर येथील वाहनधारकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली.
वाहन चोरीसह पेट्रोल चोरट्यांचीही टोळी –
वाळूज औद्योगिक वसाहत तसेच परिसरातील कामगार वसाहतीतून दुचाकीसह चारचाकी व इतर वाहन चोरीच्या घटना नेहमी घडतात. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनेमुळे वाहनधारक त्रस्त झाले असतानाच आता पेट्रोल चोरीची सुद्धा मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाहन चोरांच्या टोळी प्रमाणेच पेट्रोल चोरट्यांची टोळी असल्याचे कामगार सांगतात. येथील पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने कामगारांमध्ये ही मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
वाहन चोरीसाठी उपाय,
पेट्रोल चोरीसाठी काय? –
वाहन चोरी होऊ नये म्हणून वाहनधारक आपापल्या परीने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहने पार्क करतात. बहुतांश ठिकाणी पार्क केलेल्या वाहनावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नसतात. किंबहुना कामगारांना सुरक्षा रक्षक ठेवणे परवडत नाही. मात्र वाहन चोरीच्या घटनांना आळा बसावा. यासाठी अनेक कामगार सीसीटीव्हीच्या निगराणीत व सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये ही वाहने लावत असतात. मात्र पेट्रोल चोरी होऊ नये म्हणून वाहनधारकांनी काय व्यवस्था करावी, किंवा काही उपाय आहे का? असा प्रश्नही वाहनधारकांमधून उपस्थित केल्या जात आहे.
पेट्रोल चोर सीसीटीव्ही –
पेट्रोल चोरी करणारी टोळी पहाटे 3 वाजेच्यानंतर वगवेगळ्या ठिकाणाहून पेट्रोल चोरतात. हा प्रकार जास्त वाढत चालला म्हणून वाहनधारकांनी सीसीटीव्हीचे फुटेज खंगाळले असता 14 मे रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास पेट्रोल चोरट्यांची टोळीच पेट्रोल चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
