
वाळूजमहानगर, (ता.19) -बियांपासून झाडे तयार करण्यासाठी ज्यांना शक्य होईल त्यांनी पर्यावरण पूरक देशी, दुर्मिळ आणि आयुर्वेदिक प्रजातीच्या झाडांच्या बिया जमा करून बियांच्या बँकेमध्ये जमा कराव्यात. असे आवाहन पर्यावरणप्रेमी पोपट रसाळ यांनी केले आहे.

पर्यावरण प्रेमी पोपट रसाळ यांनी पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून 2006 साली पर्यावरणाच्या सेवेला सुरुवात करून संभाजीनगर शहरांमध्ये एक मोठी लोक चळवळ निर्माण केली आहे. तसेच सिने अभिनेते व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतील वृक्ष बँक (झाडांची बँक) चालू केली. या झाडांच्या बँकेला बिया उपलब्ध करून देण्यात याव्या म्हणून छत्रपती संभाजी राजे झाडांच्या बियांची बँक चालू केली.
आतापर्यंत लाखो बिया जमा करून त्या बियांपासून रोपे तयार करून लावली आहेत. त्यांनी लोकसहभागातून वाळूज महानगर, साजापूर, बजाजनगर, निघोज या परिसरात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 996 झाडे लावली असून 93 टक्के पेक्षा जास्त झाडे जगवली. बियांपासून झाडे तयार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्यांना शक्य होईल त्यांनी पर्यावरण पूरक देशी, दुर्मिळ आणि आयुर्वेदिक प्रजातीच्या झाडांच्या बिया जमा करून छत्रपती संभाजी राजे बियांच्या बँकेमध्ये जमा कराव्यात. असे आवाहन करण्यात आले आहे.
