वाळुज महानगर, (ता.12)- रमजान ईद निमित्त ड्राय डे असताना सुद्धा बिनदिकतपणे दारू विक्री होत असल्याने वाळुज एमआयडीसी पोलिसांनी छापेमारी करत जवळजवळ साडेबावीस हजार रुपयाची दारू जप्त केली. ही गुरुवारी (ता.11) रोजी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत मुद्देमालासह 14 जणांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमजान ईद या सणानिमित्त शासनातर्फे अधिकृत दारु विक्रेते यांना गुरुवारी (ता.11) रोजी दारु विक्री न करण्याबाबत शासनाचे आदेश होते. तरीसुद्धा अनेक ठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू होती. या अवैध दारू विक्रेत्यांना पायबंद घालण्याच्या अनुशंगाने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे शोधपथकाने छापे मारुन 14 अवैध दारू विकणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांनी जप्त केलेल्या दारूमध्ये 180 एमएलच्या देशी दारुच्या 379 बॉटल एकुण 22 हजार 330 रुपये किमतीची देशी दारू जप्त करुन 14 आरोपी विरुध्द कार्यवाही करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 चे नितीन बगाटे व सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी केली.
