May 9, 2026


वाळूज महानगर, (ता 21) – रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात मुरूम टाकणे व पथदिवे लावण्याच्या कारणावरून ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्याच्या पतीमध्ये वाद झाल्याने एका महिला सदस्यपतीच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (ता.21) रोजी सकाळी 11.45 वाजता घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील ग्रामविकास अधिकारी उत्तम चांगदेव भोंडवे (47) रा. लासुर नाका, गंगापूर हे शुक्रवारी (ता.21) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वाळुज ग्रामपंचायत कार्यालयात असताना ग्रामपंचायत सदस्य विमलबाई चापे यांचे पती काकासाहेब मुरलीधर चापे तेथे आले. या वेळी त्यांनी वार्डातील लाईट चालू करा, जीवनलाल पाटणी प्रवेशद्वारातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचते. ते येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या व वाहनधारकांच्या अंगावर उडते. त्यामुळे व्यापारी व नागरिकांची त्रस्त झाले आहे. तेथे मुरूम टाकण्यात यावा. अशी मागणी केली.

यावेळी भोंडवे यांनी अगोदर वार्डात थकीत असलेले टॅक्स जमा करा. असे सांगितले. यावरून ग्रामविकास अधिकारी भोंडवे व काकासाहेब चापे यांच्यात शाब्दिक वाद होऊन प्रकरण शिवीगाळ व हातापायीवर गेली.

यावेळी चापे यांनी भोंडवे यांची कॉलर पकडून तुला पाहून घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी ग्राम विकास अधिकारी उत्तम भोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलिस ठाण्यात काकासाहेब चापे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चापे यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले हे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *