May 9, 2026


वाळूजमहानगर, (ता.20) – शेतीच्या वादातून गैर कायद्याची मंडळी जमा करून जिवे मारण्याची धमकी देत तलवारीने एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याने दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले. जखमीतील दोन ते तीन गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. ही घटना वाळूज परिसरातील वडगाव (को.) गट नंबर 59, लाल माती, सीता नगर वडगाव, (कोल्हाटी) येथे गुरुवारी (ता.20) रोजी 11.15 वाजता घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथील माजी सरपंच एकनाथ तुकाराम साळे व त्रिंबक आसाराम साळे यांच्यात गट नंबर 59 मधील शेतीचा वाद आहे. गुरुवारी (ता.20) रोजी 11.15 वाजेच्या सुमारास साळे कुटुंब शेतात असताना दोन्ही गटात वाद झाला. यावेळी आरोपींनी संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमा करून जिवे मारण्याची धमकी देत तलवारीने हल्ला केला. गट नंबर 59, लाल माती, सीतानगर वडगाव कोल्हाटी ता. जि.छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या हल्ल्यात माजी सरपंच एकनाथ तुकाराम साळे, पंचायत समिती सदस्य राजेश तुकाराम साळे, उद्धव तुकाराम साळे, मयूर एकनाथ साळे तसेच विरुद्ध गटाचे मुकेश त्रिंबक साळे व अभिषेक त्रिंबक साळे असे सहा जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले असून तीन जण गंभीर जखमी आहे. त्यातील राजेश साळे व एकनाथ साळे यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. या प्रकरणी राजेश तुकाराम साळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी मुकेश उर्फ बबलू त्रिंबक साळे, अभिषेक त्रिंबक साळे, ऋषिकेश त्रिंबक साळे, त्रिंबक आसाराम साळे सर्व रा.वडगाव (को.) ता.जि छपत्रती संभाजीनगर यांच्या विरोधात कलम 307, 341, 504, 506, 34 भादंविसह 4, 25 हत्यार कायदा, 135 मपोकानुसार नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावडे करीत आहे. दरम्यान त्रिंबक आसाराम साळे यांच्या गटातील मुकेश साळे व अभिषेक साळे या जखमींवर उपचार सुरू असून याप्रकरणी परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *